दीड वर्षे हिंसाचार बघितल्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचा राजीनामा; आमदारांच्या विरोधानंतर घेतला निर्णय
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दीड वर्षे हिंसाचार बघितल्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचा राजीनामा; आमदारांच्या विरोधानंतर घेतला निर्णय

दीड वर्षे हिंसाचार बघितल्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचा राजीनामा; आमदारांच्या विरोधानंतर घेतला निर्णय

Updated Feb 09, 2025 07:18 PM IST

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. राज्यात प्रदीर्घ काळ झालेल्या हिंसाचारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचा राजीनामा
मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचा राजीनामा

Manipur CM N Biren Singh Resign : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजभवनात त्यांनी राज्यपाल अजयकुमार भल्ला यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. राज्यातील हिंसाचारामुळे त्यांच्यावर बराच काळ टीकेची झोड उठली होती. पक्षाचे अनेक आमदारही त्यांच्यावर नाराज होते. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १२ आमदार नेतृत्व बदलासाठी आग्रही होते.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आपल्या नेतृत्व क्षमतेबद्दल भाजपमध्ये वाढत असलेला असंतोष दूर करण्यासाठी राजीनामा दिला. त्यांच्या सरकारला काँग्रेसकडून संभाव्य अविश्वास प्रस्ताव आणि बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले असते. बीरेन सिंह यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष ए. शारदा, भाजपचे खासदार संबित पात्रा आणि किमान १४ आमदार उपस्थित होते.

बीरेन सिंह यांनी राज्यपालांना सादर केलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, प्रत्येक मणिपुरीच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्याबद्दल मी आभारी आहे. शासनाने विविध विकासकामांना गती देऊन विविध प्रकल्प राबविले. बिरेन सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या सततच्या मदतीमुळे आणि मार्गदर्शनामुळे मणिपूरच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली.

राजीनामा कशासाठी?

कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) पाठिंबा काढून घेतला असला तरी भाजपकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ होते. पण पक्षातील काही आमदारांनी नेतृत्व बदलाची मागणी लावून धरली होती. बहुमत चाचणी झाली असती तर या असंतुष्ट आमदारांनी पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करण्याची शक्यता होती, ज्यामुळे  भाजपवर सरकार कोसळण्याचे संकट ओढवले असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

एन. बिरेन सिंह आज सकाळी दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि संभाव्य पर्यायांवर चर्चा झाली. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १२ आमदार नेतृत्व बदलासाठी आग्रही होते, तर ६ आमदार तटस्थ भूमिका घेत होते. याशिवाय विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्यातील मतभेद हेही महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

मणिपूर विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून, म्हणजेच १० फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार होते. या अधिवेशनात विरोधी पक्ष काँग्रेस बीरेन सिंह सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होते. पण, त्यापूर्वीच बीरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यात पक्षप्रमुखांशी बोलून नवा नेता निवडला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर