आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना ते एका मोठ्या अपघातातून बचावले. दिलासादायक बाब म्हणजे यावेळी कोणालाही इजा झाली नाही. नायडू यांच्या अगदी जवळून एक ट्रेन गेली अगदी काही इंच अंतरामुळे ते बचावले, असे सांगण्यात येते. मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी नुकताच पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
मुख्यमंत्री नायडू गुरुवारी पूरग्रस्त भागाचा आढावा घेत होते. त्यावेळी ते मधुरा नगर रेल्वे पुलावर होते. रेल्वे रुळाशेजारी वाहतुकीसाठी खास तयार करण्यात आलेल्या अगदी छोट्या पुलावरून चालत जात असताना अचानक गाडी त्याच ट्रॅकवर आली.
घटनास्थळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी नायडू यांना तात्काळ रुळापासून बाहेर काढले आणि गाडी तिथून निघून गेली. रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री नायडू रेल्वेपासून केवळ काही इंच दूर होते. गेल्या पाच दिवसांपासून पूरग्रस्त भागाचा दौरा करणारे नायडू अनेकदा सुरक्षेचे नियम मोडताना दिसले आहेत. यावेळी ते गुडघाभर पाण्यात उतरले आणि एनडीआरएफच्या बोटींवर चढताना दिसले.
पीटीआयच्या एका व्हिडिओनुसार, मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विजयवाडा येथील एका छोट्या रेल्वे पुलाच्या माथ्यावरून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत अनेक अधिकारी आणि एनएसजी कमांडो होते. पाहणीदरम्यान नायडू पुलाच्या रेलिंगजवळील अरुंद प्लॅटफॉर्मवर गाडी वेगाने जात असताना कोणतीही भीती न बाळगता उभे राहिले. रेल्वेतील प्रवाशांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी सांगितले की, आंध्र प्रदेशात पुरामुळे १.८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. दोन लाख शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले चौहान म्हणाले, 'पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येथे फुलांची लागवड केली जाते, हळदीची लागवड केली जाते, सर्व पिके नष्ट झाली आहेत.
या नुकसानीची पाहणी प्रक्रिया सुरू झाली असून एनडीआरएफची पथके आणि कृषी विभागाचे अधिकारी नुकसानीचा आढावा घेत आहेत. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे चौहान यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरपरिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे चौहान यांनी सांगितले.