Narendra Modi in Jalgaon : ‘महिलांवरील अत्याचार हे अक्षम्य पाप आहे. हे पाप करणारा कोणीही असो, तो सुटता कामा नये. त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्यांनाही सोडता कामा नये. सर्वांचा हिशेब व्हायला हवा,’ असं स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला.
'आज मी देशातील प्रत्येक राजकीय पक्ष आणि राज्य सरकारनं महिला सुरक्षेबाबत सजग राहिलं पाहिजे. महिलांवरील अत्याचार हे अक्षम्य पाप आहे. गुन्हेगार कोणीही असो, त्याला सोडता कामा नये. त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्यांना सोडता कामा नये. मग ती रुग्णालये असोत, शाळा असोत, कार्यालये असोत किंवा पोलिस... कुठल्याही स्तरावर निष्काळजीपणा झाला तरी प्रत्येकाचा हिशेब करायला हवा. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी आमचं सरकार सातत्यानं कायदे कडक करत आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.
'काही वर्षांपूर्वीपर्यंत महिलांवर अनेक निर्बंध होते. अनेक क्षेत्र त्यांच्यासाठी खुली नव्हती. आमचं सरकार मुलींसाठी प्रत्येक क्षेत्र खुलं करत आहे. आज सैन्याच्या तिन्ही दलात महिला अधिकारी तैनात केल्या जात आहेत, लढाऊ वैमानिक म्हणून महिला सेवा बजावत आहेत. गाव खेड्यात शेती आणि डेअरी क्षेत्रापासून ते स्टार्टअप्स पर्यंत विविध व्यवसाय मुली सांभाळत आहेत. गरिबांसाठी बनवली जाणाऱ्या घरांची नोंदणी महिलांच्या नावावर व्हावी, असा निर्णय आमच्या सरकारनं घेतला. आतापर्यंत बांधण्यात आलेली ४ कोटी घरे बहुतांश महिलांच्या नावावर आहेत. आता आम्ही आणखी ३ कोटी घरं बांधणार आहोत, यातील बहुतेक घरे आमच्या माता-भगिनींच्या नावावर असतील, असं मोदी म्हणाले.
'लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी ३ कोटी बहिणींना लखपती दीदी बनविण्याचं वचन दिलं होतं. बचत गटांच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांत १ कोटी महिला लखपती दीदी झाल्या आणि अवघ्या दोन महिन्यांत आणखी ११ लाख महिला लखपती दीदी झाल्या. आज इथं लखपती दीदींचा मेळावा होतोय. माझ्या बहिणी मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहेत. आज देशभरातील लाखो महिला मंडळांसाठी ६ हजार कोटींहून अधिक निधी देण्यात आला आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
लखपती दीदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिणींची वा मुलींची कमाई वाढवण्याची मोहीम नाही. त्यातून संपूर्ण कुटुंबाला, येणाऱ्या पिढ्यांना बळ मिळत आहे. ते गावाचं संपूर्ण अर्थकारण बदलून टाकत आहेत, असा दावा मोदींनी केला.