India Canada Conflict : कॅनेडियन व्हिसावर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
India vs Canada News : भारत आणि कॅनडात सुरू असलेल्या टोकाच्या संघर्षात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळं सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
India vs Canada News Today : खलिस्तानी अतिरेकी हरप्रीत सिंग निज्जर यांच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा उघडपणे संघर्ष सुरू झाला आहे. कॅनेडियन पीएम जस्टिन ट्रुडो यांनी थेट भारत सरकारवर हरप्रीत सिंग निज्जरच्या हत्येचा आरोप केला आहे. त्यानंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी देखील कॅनडाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता केंद्रातील मोदी सरकारने मोठं पाऊल उचलत अनेकांना धक्का दिला आहे. पीएम मोदी यांच्याकडून कॅनेडियन व्हिसावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता कोणत्याही भारतीय नागरिकाला कॅनडा प्रवेश देण्यात येणार नाहीय. पुढील सूचना येईपर्यंत व्हिसाबंदी लागू असणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या दूतांना एकमेकांच्या देशात जाण्याच्या सूचना केल्या होत्या. राजनैतिक हकालपट्टी केल्यानंतर आता भारताने कॅनडाच्या व्हिसावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कॅनडात होत असलेल्या भारतविरोधी कारवाया पाहता तेथील भारतीय नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय कॅनडात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार कॅनेडियन सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय समुदायाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी भविष्यात आणखी पावलं उचलली जाणार असल्याचं एमएईकडून सांगण्यात आलं आहे. कॅनडातील भारतीय नागरिकांना व्हँकुव्हर, ओटावा आणि टोरंटोतील महावाणिज्य दूतावासात तातडीने नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यातच आता कॅनेडियन व्हिसावर बंदी घालण्यात आल्याने कॅनडात ये-जा करणाऱ्या भारतीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.