Narayana murthy latest news : ‘वर्क लाइफ बॅलन्स या संकल्पनेवर माझा अजिबात विश्वास नाही. आपल्या देशात १९८६ साली पाच दिवसांचा आठवडा (Five Day Week) सुरू झाला तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं होतं,’ असं स्पष्ट मत उद्योगपती व इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी सांगितलं. ‘देशाचा विकास करायचा असेल तर आराम नाही काम केलं पाहिजे,’ असं ते म्हणाले.
सीएनबीसी ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये ते बोलत होते. 'लोकांनी आठवड्यातून ७० तास काम केलं पाहिजे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी नारायणमूर्ती यांनी केलं होतं. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. मात्र, त्यावर मतावर मी आजही ठाम असल्याचं नारायणमूर्ती म्हणाले. माझं ते मत अजिबात बदललेलं नाही. मरेपर्यंत बदलणार नाही. कठोर परिश्रम हेच भारताला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात, असं ते म्हणाले.
नारायणमूर्ती यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उदाहरण दिलं. नरेंद्र मोदी हे आठवड्यातून १०० तास काम करतात. ते एवढी मेहनत करू शकतात, तर आपण का करू शकत नाही?, असा प्रश्न त्यांनी केला.
'दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपान कसे वाढले आणि पुन्हा श्रीमंत देश बनले. आपण हे पाहिलं पाहिजे आणि त्यातून धडा घेतला पाहिजे. भारतानंही या मार्गाचा अवलंब केला पाहिजे आणि त्याद्वारे देशाची पुनर्बांधणी शक्य होईल, असं ते म्हणाले. जर्मनी आणि जपानच्या जनतेनं जसे प्रयत्न केले, तसे प्रयत्न आपल्यालाही करावे लागतील, असं नारायणमूर्ती म्हणाले.
नारायणमूर्ती यांनी यावेळी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे स्वतंत्र संचालक आणि नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन केव्ही कामत यांच्या वक्तव्याचाही हवाला दिला. ‘भारत हा एक गरीब आणि विकसनशील देश आहे. आपल्यापुढं अनेक आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत आपण वर्क-लाइफ बॅलन्सची चिंता करण्याऐवजी आव्हानांवर लक्ष केंद्रीत करायला हवं,’ असं कामत म्हणाले होते. त्याकडंही नारायणमूर्ती यांनी लक्ष वेधलं.
'मी आयुष्यभर या नियमाचं पालन केलं आहे आणि नेहमीच १४ तास काम केलं आहे. मी आठवड्यातून साडेसहा दिवस काम करायचो. सकाळी साडेसहा वाजता ऑफिसला पोहोचायचो, तर रात्री नऊच्या सुमारास निघायचो. मला माझ्या जीवनशैलीचा अभिमान आहे. जगात यशस्वी होण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कठोर परिश्रम. आपल्याला कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. मेहनतीला पर्याय नाही. जरी तुम्ही खूप शिकलेले असाल, तरीही तुम्ही कठोर परिश्रम केले पाहिजेत, असं ७८ वर्षीय नारायणमूर्ती यांनी सांगितलं.