Prime Minister of Bharat Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रपत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून राजकीय वाद पेटलेला असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आशियान परिषदेसाठी पीएम मोदी विदेशात जाणार आहे. यावेळी परिषदेच्या सरकारी पुस्तिकेत नरेंद्र मोदी यांचा प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळं आता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आशियान बैठकीसाठी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या बैठकीत सागरी सुरक्षा सहकार्याला चालना देण्यावर चर्चा होणार आहे. यंदाच्या बैठकीचं अध्यक्षपद इंडोनेशियाकडे आहे. आशियानच्या गटामध्ये भारत, चीन, जपान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया यांच्यासह दक्षिण आशियाई देशांचा समावेश आहे. परंतु पीएम मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तिकेत त्यांचा उल्लेख प्राईम मिनिस्टर ऑफ भारत म्हणजेच भारताचे पंतप्रधान असा करण्यात आला आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कार्यक्रमाची पत्रिका सोशल मीडियावर शेयर केली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने येत्या १९ सप्टेंबर पासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात देशातील सर्व निवडणुका एकाचवेळी घेण्याचा कायदा पास केला जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच इंडियाचं नाव बदलून भारत असं केलं जाणार असल्याचंही बोललं जात आहे. याशिवाय समान नागरी कायदा, निवडणुका आणि अन्य महत्त्वांच्या विषयांवर केंद्रातील मोदी सरकारकडून घटनादुरुस्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.