Bangladesh violence : बांगलादेशात गेल्या महिनाभरापासून आरक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. शेख हसीना सरकारने या आंदोलनावर कडक कारवाई केल्याने संपूर्ण देशात भडका उडाला. सर्वत्र हिंसाचार सुरूराजीनामा द्यावा लागला व देश सोडून पळ काढावा लागला. सध्या शेख हसिना या भारतात असून येथून त्या ब्रिटन किंवा फिनलंडसारख्या देशात जाण्याचा विचार करत आहे. दरम्यान, एवढं मोठं आंदोलन अचानक कसं उभं राहिलं आणि त्यामागे कोण होतं, हेही सर्वांना जाणून घ्यायचं आहे.
तुमचा विश्वास बसणार नाही या आंदोलनाचा लढा केवळ तीन विद्यार्थ्यांनी उभारला. नाहिद इस्लाम, आसिफ महमूद आणि अबू बकर मजुमदार अशी या तीन विद्यार्थ्याची नावे असून हे तिघेही ढाका विद्यापीठात शिकतात. त्यांनी आरक्षणाविरोधातील आंदोलन सुरू केले होते. आंदोलन वाढत असतांना या तिघांचेही १९ जुलै रोजी अपहरण करण्यात आले होते. यानंतर त्यांना मारहाण करून व चौकशी करून त्यांना त्रासही देण्यात आला. त्यानंतर २६ जुलै रोजी त्यांना पुन्हा सोडण्यात आले. त्यांचे व्हिडिओ तयार करून हे आंदोलन मागे घेण्यास देखील सांगण्यात आले. त्यांची सुटका झाल्यावर त्यांनी आरक्षणाविरोधातील लढा आणखी तीव्र केला. यांनी याचाच परिमाण म्हणजे गेल्या १० दिवसांत बांगलादेशात सत्तापालट झाला. सध्या देशाची धुरा लष्कराच्या हाती आहे. अंतरिम सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू असून, त्यात या तीन विद्यार्थी नेत्यांचीही महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
या तिघांनी आज एक व्हिडिओ जारी केला आणि घोषणा केली की अंतरिम सरकारचे प्रमुख डॉ. युनूस असतील, जे नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ आहेत. चळवळीचा सर्वात मोठा चेहरा असलेल्या नाहिद इस्लामबद्दल सांगायचे तर तो ढाका विद्यापीठातील समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे. स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन मुव्हमेंट नावाच्या चळवळीचे तो नेता आहे. एसएडीएमच्या बॅनरखाली विद्यार्थ्यांनी बांगलादेशातील कोटा पद्धतीत बदल करण्याची मागणी केली होती. या अंतर्गत बांगलादेश मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मिळणारे ३० टक्के आरक्षण रद्द करण्याची त्यांनी मागणी केली होती.
बांगलादेशमध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या नोकऱ्यांमध्ये एकूण ५६ टक्के आरक्षण आहे. ही व्यवस्था भेदभाव करणारी आणि राजकीय फायद्यासाठी वापरली जात असल्याचे म्हटले आहे. नाहिद इस्लामचा आणखी एक सहकारी असिफ महमूद हा ढाका विद्यापीठात फिलॉलॉजीचा विद्यार्थी आहे. अबू बकर मजुमदार हेही ढाका विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत. तो भूगोलाचा विद्यार्थी आहे. चळवळीत भाग घेतल्याबद्दल अबू बकरचे अपहरण करून त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. या तिन्ही विद्यार्थी नेत्यांचे वय केवळ २५ वर्षे आहे.