मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  N Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, मोदींना स्टेजवरच मारली मिठ्ठी

N Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, मोदींना स्टेजवरच मारली मिठ्ठी

Jun 12, 2024 04:04 PM IST

N Chandrababu Naidu : तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी आज चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर चंद्राबाबू नायडूंनी मोदींना मिठ्ठी मारली.
मुख्यमंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर चंद्राबाबू नायडूंनी मोदींना मिठ्ठी मारली. (PTI)

तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आंध्रचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर, तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदराजन शपथविधीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, बांदी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडाच्या बाहेरील केसरापल्ली येथील गन्नावरम विमानतळाजवळ सकाळी ११ वाजून २७ मिनिटांनी शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू यांच्यासह जनसेना प्रमुख पवन कल्याण, चंद्राबाबूंचे पूत्र लोकेश आणि इतर २२ जणांनीही शपथ घेतली.

पवन कल्याण यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. जनसेनेला तीन आणि भारतीय जनता पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नायडू यांनी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली. २०१४ च्या विभाजनानंतर नायडू चौथ्यांदा आंध्रचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारत आहेत. चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव आणि टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू, अभिनेते चिरंजीवी, रजनीकांत, नंदमुरी बालकृष्ण यावेळी उपस्थित होते.

नायडू यांच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम- भाजप-जनसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले होते.

आंध्र प्रदेशच्या १७५ सदस्यांच्या विधानसभेत तेलुगू देसमपक्षाचे १३५ आमदारांसह बहुमत आहे, तर मित्रपक्ष जनसेना पक्षाकडे २१ आणि भाजपकडे ८ आमदार आहेत. विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस पक्षाचे ११ आमदार आहेत.

टीडीपी च्या आमदारांनी शपथ घेतली त्यामध्ये नारा लोकेश, किंजरापू अत्चन्नाडू, निमला रामानायडू , एनएमडी फारुख, अनम रामनारायण रेड्डी, पयावुला केशव, कोल्लू रवींद्र, पोनगुरु नारायण, वांगलापुडी अनिता, अनगानी सत्य प्रसाद, कोलुसू पार्थसारधी, कोला बालवीरंजनेय स्वामी, गोट्टीपती रवी, गुम्माडी संध्याराणी, बीसी जनार्दन रेड्डी, टीजी भरत, एस सविता, वासमसेट्टी सुभाष, कोंडापल्ली श्रीनिवास आणि मंडीपल्ली रामप्रसाद रेड्डी यांचा समावेश होता.

१७५ सदस्यीय आंध्र प्रदेश विधानसभेत मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह २६ मंत्री असू शकतात. तेलगू देसम विधिमंडळ पक्ष आणि एनडीएच्या घटक पक्षांनी मंगळवारी, ११ जून रोजी झालेल्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये नायडू यांची नेतेपदी निवड केली.

अमरावतीला राज्याची एकमेव राजधानी म्हणून विकसित करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नायडू यांनी आमदारांना संबोधित करताना सांगितले. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, चिरंजीवी आणि अभिनेता-राजकारणी नंदमुरी बालकृष्ण यांनीही केसरपल्ली आयटी पार्कमधील गन्नावरम मंडळात झालेल्या या कार्यक्रमाला हजेरी लावली.

नायडू १९९५ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पुढे दोन टर्म राहिले. मुख्यमंत्री म्हणून त्यांची पहिली दोन टर्म १९९५ पासून सुरू होऊन २००४ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. त्यांची तिसरी टर्म राज्याच्या विभाजनानंतर आली. २०१४ मध्ये नायडू हे स्वतंत्र आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. २०१९ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

२०२४ च्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर वायएसआर काँग्रेसची सत्ता उलथवून पुन्हा सत्तेत आले. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एनडीएने विधानसभेच्या १७५ पैकी १६४ आणि लोकसभेच्या २५ पैकी २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

WhatsApp channel