tripti tyagi muzaffarnagar video : उत्तर प्रदेशातील एका खाजगी शाळेत मुस्लिम असल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आरोपी शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. युपीतील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील ज्या शाळेत ही घटना घडलीय, ती शाळाच बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शुभम शुक्ला यांनी काढला आहे. त्यानंतर आता आरोपी तृप्ती त्यागी या शिक्षिकेवरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुजफ्फरनगरमधील एका शाळेतला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात आरोपी तृप्ती त्यागी ही शिक्षिका वर्गातील अन्य विद्यार्थ्यांना एका मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण करायला लावत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. तसेच आरोपी शिक्षिका 'मुस्लिम विद्यार्थ्यांनी त्यांच्या एरियात जावं', असंही व्हायरल व्हिडिओत म्हटलं आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी तृप्ती त्यागी यांची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेने शिक्षण खात्याच्या निकषांची पूर्तता केली नसल्याने शाळा बंद करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
शाळेची निकष पूर्ण करण्यासाठी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनेकदा नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. परंतु त्यांच्याकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळंच आता प्रशासनाने धडक कारवाई करत आरोपी शिक्षिका तृप्ती त्यागी यांची शाळा बंद केली आहे. तसेच शाळेतील ५० विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत सामावून घेतलं जाणार असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आता आरोपी तृप्ती त्यागी या शिक्षिकेवरही कायदेशीर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या