Mumbai-Pune Expressway Road Accident: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर रविवारी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुधाचा टँकर, ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. दूधाचा टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना चालकाने बोर घाट उतरताना लेन बदलली. यानंतर टँकर पलटी होऊन समोरील ट्रक आणि कारला धडकले. या अपघातात दूध टँकर चालकाचा मृत्यू झाला. तर, कारमधील दोघेजण थोडक्यात बचावले. मात्र, त्यांना दुखापत झाली असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर बराच वेळ वाहतूक बंद होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दूध टँकर चालकाने लेन बदलमुळे हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच खोपली पोलीस, महामार्ग पोलीस आणि आयआरबी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी कारमधील जखमींना रुग्णालयात पाठवले आणि अपघातग्रस्त वाहने बाजुला करीत वाहतूक सुरळीत केली.