Mumbai Viral News: मुंबईच्या एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर स्विगीवर सूचीबद्ध फ्रेशमेनू रेस्टॉरंटच्या स्वच्छतेची धक्कादायक स्थिती उघड केली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने पनीर बर्गर मागवला होता, पण त्याऐवजी चिकन बर्गर मिळाले. त्याने सांताक्रूझ पूर्वेकडील कलिना येथील रेस्टॉरंटमध्ये जाऊन चौकशी केली असता तेथील स्वच्छता पाहून ग्राहकाला मोठा धक्का बसला. त्याने संबंधित रेस्टॉरंटचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
संबंधित ग्राहकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या व्हिडिओत ग्राहकाने सांगितले की, त्याने स्विगीवरून पनीर बर्गर ऑर्डर केले. परंतु, त्याऐवजी त्याला चिकन बर्गर मिळाले. यानंतर त्याने मुंबईतील सांताक्रूझ पूर्व येथील संबंधित रेस्टॉरंटला भेट दिली. तिथे पोहोचल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. या रेस्टॉरंटची स्वच्छता पाहून त्याने इतर लोकांनाही स्विगीवरून ऑर्डर करताना काळजी घेण्याचे आवाहन केले.
हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. ग्राहकांसह डिलिव्हरी रायडर्सने यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अनेकांनी रेस्टॉरंटच्या स्वच्छतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, डिलिव्हरी बॉय म्हणून मला गोष्टी सांगायच्या आहेत, ज्या हॉटेलमध्ये डायन-इन नाही, अशा हॉटेलमधून कधीही ऑर्डर करू नका. कारण जवळपास सर्वच हॉटेलमध्ये स्वच्छता राखली जात नाही. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, झॉमॅटोच्या लिस्टेड जवळपास ७० टक्के रेस्टॉरंटचे अशीच परिस्थिती आहे. मी स्वत: त्या ठिकाणाची तपासणी करतो आणि ग्राहकांना सावध करतो की, पुन्हा तेथून ऑर्डर करू नका. परंतु हे ग्राहकांवर अवलंबून आहे.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने असे म्हटले आहे की, भारतातील अनेक लोकांना फक्त स्वस्तात अन्न हवे आहे. त्यांना स्वच्छतेशी काहीही करायचे नाही. ते नेहमीच सूट आणि कमी किंमतीच्या गोष्टींकडे आकर्षित होत राहतात. त्यामुळे माहिती नसलेल्या लोकांची फसवणूक होते. दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, दर्जेदार अन्न आणि स्वच्छतेच्या संकल्पना आपल्यासाठी कशा परक्या आहेत, हे भीतीदायक आहे!' महत्त्वाचे म्हणजे, पहिल्यांदाच असे घडले नसून याआधीही फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म असलेल्या कंपन्यांविरोधात ग्राहकांनी आवाज उठवला आहे.
संबंधित बातम्या