Mumbai Local Train News: मुंबई एसी लोकलमध्ये एका प्रवाशाने तिकीट तपासकासोबत गैरवर्तन आणि त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या जलद एसी लोकलमध्ये हा प्रकार घडला. या लोकल मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग हे तिकीट तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना ३ प्रवासी फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन एसी लोकलमध्ये प्रवास करताना आढळले. यानंतर सिंग यांनी प्रवाशांना रेल्वेच्या नियमांनुसार दंड भरण्यास सांगितले. त्यावेळी जसबीर सिंग आणि प्रवासी अनिकेत भोसले याच्यात वाद झाला. मात्र, हा वाद मिटण्याऐवजी आणखी पेटला. लोकल बोरीवली स्थानकावर पोहोचली, तेव्हा जसबीर सिंग यांनी भोसले यांना लोकलमधून उतरण्याची विनंती केली. पण भोसले यांनी नकार दिला आणि सिंह यांना शिवीगाळ आणि मारहाण केली.
या घटनेत सिंह यांचा शर्ट फाटला. तसेच सिंह यांनी इतर प्रवाशांकडून दंड म्हणून वसूल केलेले १ हजार ५०० रुपये गमावले, असा दावा सिंह यांनी केला. भांडणामुळे ट्रेन बोरिवली येथे थांबवण्यात आली, अशी माहिती एका रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. अखेर भोसले याला नालासोपारा येथे ट्रेनमधून उतरवण्यात आले. नोकरीच्या संभाव्यतेवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबद्दल चिंता व्यक्त करत भोसले याने आपली चूक मान्य केली आणि जसबीर सिंगला हरवलेले १५०० रुपये देऊन अधिकाऱ्यांकडे लेखी माफी मागितली. भोसले याने लेखी माफी मागितल्यानंतर जसबीर सिंग यांनी त्याला माफ करणे पसंत केले.
काही दिवसांपूर्वी रशियन तरुणीने मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर करत नागरिकांचे कौतुक केले होते. मेरी चुगुरोवा, असे या तरुणीचे नाव आहे. ती एक ट्रॅव्हल ब्लॉगर आणि एक व्हिडीओ क्रिएटर आहे. ती व्लॉगिंग करण्यासाठी गोव्यामध्ये आली होती. त्यावेळी तिला मुंबई लोकल ट्रेनबद्दल माहिती मिळाली. मुंबई लोकलमधून एकाच वेळी हजारो लोक प्रवास करत असल्याची माहिती तिला मिळाली. हा अनुभव घेण्यासाठी ती मुंबईत आली. मुबंई लोकलमधून प्रवास करताना मुंबईकरांनी तिच्याची अत्यंत प्रेमाने संवाद साधला. तिला बसण्यासाठी जागा दिली, असे तिने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले.