Ejaz Lakdawala News: ऑक्टोबर 1996 मध्ये उद्योगपती फरीद मकबुल हुसेन यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने गँगस्टर एजाज लकडावाला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, कथित मुख्य सूत्रधार छोटा राजनची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
फरीदला गोळ्या घालणाऱ्या दोन व्यक्तींना विशेष न्यायालयाने १९९८ मध्ये निर्दोष सोडले होते. त्यानंतर न्यायालयाने गुरुवारी लकडावालाला पुराव्यांवरून दोषी ठरवले. फिर्यादी पक्षाने दावा केला होता की, जेव्हा दोन हल्लेखोरांनी फरीद यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी लकडावाला फरीदच्या कार्यलयात होता. लकडावाला यांचे वकील देवानंद मणेरकर म्हणाले की, सविस्तर आदेशाची प्रत मिळाल्यावर ते उच्च न्यायालयात जातील.
दरम्यान, ७ ऑक्टोबर १९९६ रोजी संध्याकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास फरीद हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. तेव्हा दोन हल्लेखोर त्यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी फरीद यांना गोळ्या झाडल्या. चार गोळ्या झाडल्यानंतर दोघेही तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, सायंकाळी ७ वाजता गस्तीवर असलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी या दोन हल्लेखोरांना पकडून त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त केले. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला होता की, न्यायवैद्यक अहवालात मृताच्या शरीरातून जप्त करण्यात आलेल्या गोळ्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीतून मारण्यात आल्याची पुष्टी झाली आहे.
फरीदच्या भावाने आपल्या वक्तव्यात दावा केला होता की, तो फरीदला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना हल्लेखोरांनी त्याला सांगितले की, त्याने हल्लेखोरांसमोर आपल्या जीवाची भीक मागितली, पण त्यांनी दया दाखवली नाही. भावाच्या जीवाची भीक मागायची असेल तर नाना यांच्याकडे मागायला सांगितले. फरीदच्या भावाने असेही सांगितले की, त्यावेळी नाना कोण आहे, हे त्याला माहिती नव्हते, पण नंतर कळाले की, तो छोटा राजन होता.