मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Mumbai Delhi Railway Traffic Disrupted Due To Rain In Bharuch To Ankleshwar

Mumbai Delhi Train : मुंबई-दिल्ली रेल्वे वाहतूक खोळंबली; प्रवाशांचा संताप, नेमकं कारण काय?

Mumbai Delhi Train News
Mumbai Delhi Train News (Utpal Sarkar)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Sep 19, 2023 08:59 AM IST

Mumbai Delhi Train : मुंबई-दिल्ली रेल्वे वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

Mumbai Delhi Train News : मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या आणि दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या रेल्वेगाड्या गुजरातमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वेसेवा खोळंबल्याने गेल्या अनेक तासांपासून प्रवासी ताटकळले आहे. त्यानंतर आता रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. परिणामी भरूच ते अंकलेश्वर या रेल्वेमार्गावरील सर्व प्रकारच्या रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने रात्री अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. भरूच ते अंकलेश्वर या रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने दिल्ली-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळं काही काळासाठी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली असून कमी वेगमर्यादेसह रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. गुजरातमधील अमरगड ते पंचपिपलिया या स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचलं आहे. परिणामी रुळांखालील माती वाहून गेली आहे. त्यानंतर ५०० श्रमिकांसह रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. पावसामुळं ४० हून अधिक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून किमान २०० रेल्वेंचं वेळापत्रक बदलण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून जाणारी राजधानी एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि डहाणू-विरार मेमू रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं गणेशोत्सवानिमित्त प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गुजरातमधील रेल्वे रुळांवर पाणी वाहत असल्याने पश्चिम रेल्वेने भोपाळ-इटारसी-खंडवामार्गे रेल्वे वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना बसगाड्यांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळं रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे वाहतुकीची माहिती घेवूनच प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.