Gangster Prasad Pujari News: जवळपास २० वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर असलेला पुजारीला चीनमधून भारतात आणले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे पथक त्याला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन पोहोचले आहेत.मुंबईत पुजारीवर हत्या आणि खंडणीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सिटी क्राफ्ट शाखेने त्याची संपूर्ण टोळी उद्ध्वस्त केली. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
दरम्यान, अटकेपासून वाचण्यासाठी पुजारीने चीनमधील एका महिलेशी लग्न केले, तिथे तो एका मुलाचा बाप झाला, त्याचा मुलगा आता चार वर्षांचा आहे. त्याला पकडण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरुच होते. त्याला भारतात परत आणण्यासाठी तब्बल २० वर्ष लागले. मार्च २००८ मध्ये प्रसाद पुजारीला चीनमध्ये तात्पुरते वास्तव्य मिळाले होते, ज्याची मुदत मार्च २०१२ मध्ये संपली होती. २०२० मध्ये मुंबई गुन्हे शाखेने पुजारीच्या आईला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना पुजारीच्या ट्रॅव्हल व्हिसाची मुदत संपल्याची माहिती मिळाली. यामुळे त्याला लवकरच भारतात परत आणता येईल, असे पोलिसांनी सांगितले.
प्रसाद पुजारीने गुन्हेगारी हाच आपला व्यवसाय बनवला होता. त्याचे कुटुंबही गैरकृत्यांमध्ये सक्रिय होते. गँगस्टर पुजारी भारतापासून शेकडो किलोमीटर दूर राहूनही देशविरोधी कारवायांमध्ये सामील होता. मुंबईतील विक्रोळी येथे सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबारात प्रसाद पुजारी यांचा हात होता. ही गोळीबाराची घटना १९ डिसेंबर २०१९ रोजी घडली. या गोळीबारात जाधव थोडक्यात बचावले.