Badruddin Ajmal : तीनदा खासदार झालेल्या मुंबईच्या प्रसिद्ध अत्तर व्यावसायिकाचा आसाममध्ये १० लाख मतांनी पराभव
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Badruddin Ajmal : तीनदा खासदार झालेल्या मुंबईच्या प्रसिद्ध अत्तर व्यावसायिकाचा आसाममध्ये १० लाख मतांनी पराभव

Badruddin Ajmal : तीनदा खासदार झालेल्या मुंबईच्या प्रसिद्ध अत्तर व्यावसायिकाचा आसाममध्ये १० लाख मतांनी पराभव

Jun 05, 2024 07:35 PM IST

दक्षिण मुंबई 'अजमल परफ्युम' या अत्तराच्या प्रसिद्ध शोरुमचे संचालक आणि तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले बदरुद्दिन अजमल यांना यंदा आसामच्या धुबरी लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव पत्करावा लागला.

मुंबईचे प्रसिद्ध अत्तर व्यावसायिक बदरुद्दिन अजमल यांचा आसाममध्ये पराभव
मुंबईचे प्रसिद्ध अत्तर व्यावसायिक बदरुद्दिन अजमल यांचा आसाममध्ये पराभव

मुंबई शहरातील अत्तराचे प्रसिद्ध व्यावसायिक बदरुद्दिन अजमल (Badruddin Ajmal) यांचा आसाममध्ये दारुण पराभव झाला आहे. मुंबईत राहणारे अजमल यांचा अत्तरांचे उत्पादन करून विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. मुंबईत मुख्यालय असलेला ‘अजमल परफ्युम’ हा ब्रॅंड देश-विदेशात प्रसिद्ध आहे. अजमल यांचे मूळ गाव आसामच्या धुबरी जिल्ह्यात असून तेथे त्यांनी अनेक शिक्षण संस्थाही उभारल्या आहेत. आसाममध्ये सीमा भागात राहणाऱ्या निर्वासितांचा मोठा प्रश्न असून या प्रश्नांवर अजमल यांनी अनेक आंदोलने केली आहेत. आसाममध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या प्रश्नावर लढा देत असताना त्यांनी २००५ साली ‘ऑल इंडिया युनायडेट डेमोक्रेटिक फ्रंट’ (All India United Democratic Front) नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. अजमल हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. अजमल हे आसाममधील धुबरी लोकसभा मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ अशा तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजमल यांच्या पक्षाचे तीन खासदार निवडून आले होते. यात स्वतः अजमल (धुबरी लोकसभा), त्यांचा मुलगा सदरुद्दिन अजमल (बारपेट लोकसभा) आणि राधेश्याम बिस्वास (करिमगंज लोकसभा) हे खासदार निवडून आले होते. मात्र यंदा २०२४च्या निवडणुकीत अजमल यांच्या 'ऑल इंडिया युनायडेट डेमोक्रेटिक फ्रंट’ पक्षाचे उमेदवार तीनही जागांवर पराभूत झाले आहे. धुबरी मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार रकिबुल हुसेन यांनी बदरुद्दिन अजमल यांचा तब्बल १० लाख १२,४७६ अशा विक्रमी मतांनी पराभव केला आहे. 

प्रियंका गांधींच्या रॅलीने हवा पालटली

२००९ साली ‘ऑल इंडिया युनायडेट डेमोक्रेटिक फ्रंट’ हा पक्ष कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा भाग होता. त्यानंतर झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत आघाडीचा पराभव झाल्याने दोन्ही पक्ष आघाडीतून बाहेर पडले होते. शिवाय अजमल हे छुप्या पद्धतीने भाजपला मदत करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. धुबरीमध्ये कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी १ मे २०२४ रोजी प्रचार सभा घेतली होती. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी अजमल हे भाजपला छुप्या पद्धतीने मदत करत असून त्यांचा पराभव करण्याचे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले होते. त्यानंतर येथील चित्र पालटून कॉंग्रेस उमेदवाराचा दणदणीत विजय झाल्याचे दिसून आले आहे. २०२१ साली झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत ‘ऑल इंडिया युनायडेट डेमोक्रेटिक फ्रंट’चे १६ आमदार निवडून आले आहेत. 

‘अजमल ब्रँड’ची मुंबईत अनेक ठिकाणी आउटलेट्स

अजमल हे मुंबईस्थित अत्तराचे मोठे व्यावसायिक असून ते दक्षिण मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत राहतात. दक्षिण मुंबईतील रिगल थिएटर येथे 'अजमल परफ्युम'चे मोठे शोरुम आहे. ‘अजमल परफ्युम’चे मुंबई उपनगरांसह देशातील प्रमुख शहरांमध्ये तसेच मध्य पूर्वेतील विविध आखाती देशांमध्येही शोरूम उघडले आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर