Mumbai: मुंबईकरांनो सावधान, शहरात फिरतेय बोल बच्चन गँग; बोलता- बोलता महिलेचे हजारो रुपयांचे दागिने लुटले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मुंबईकरांनो सावधान, शहरात फिरतेय बोल बच्चन गँग; बोलता- बोलता महिलेचे हजारो रुपयांचे दागिने लुटले!

Mumbai: मुंबईकरांनो सावधान, शहरात फिरतेय बोल बच्चन गँग; बोलता- बोलता महिलेचे हजारो रुपयांचे दागिने लुटले!

Dec 20, 2024 09:16 PM IST

Bol Bachchan Gang: मुंबईतील मीरा- भाईंदर येथे बोलता- बोलता एका वृद्ध महिलेचे ७२ हजारांचे दागिने लुटल्याची घटना घडली.

मुंबई: बोलता- बोलता महिलेचे ७२ हजारांचे दागिने लुटले
मुंबई: बोलता- बोलता महिलेचे ७२ हजारांचे दागिने लुटले

Mumbai News: मुंबईत बोल बच्चन गँग फिरत असून ते वृद्ध महिलांना टार्गेट करत असल्याची माहिती समोर आली. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत भाईंदर येथील औद्योगिक युनिटमध्ये काम करणाऱ्या ६७ वर्षीय महिलेचे ७२,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले. जैबुनिसा अन्सारी (वय, ६७) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. अन्सारी या गेल्या आठवड्यात कामावर जात असताना भाईंदर रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने त्यांना अडवले आणि बोलता बोलता त्यांच्या जवळील सर्व दागिने लुटून नेले. या घटनेने नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली असून पोलीस बोल बच्चन गँगचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी या मालाड येथील रहिवाशी असून मीरा- भाईंदर येथील औद्योगिक युनिटमध्ये काम करतात. अन्सारी गेल्या आठवड्यात कामावर जात असताना एका व्यक्तीने त्यांना थांबवले. त्याच्यासोबत १२ वर्षाचा मुलगा होता. या व्यक्तीने त्याचे बायकोसोबत भांडण झाल्याचे सांगितले. त्याने अन्सारी यांना मातृस्वरूप असल्याचे सांगून हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्ती करण्याची विनंती केली. यामुळे अन्सारी यांनी त्याच्या बायकोला भेटायचे ठरवले आणि तिघेही रेल्वे स्थानकाकडे परतले.

फूट-ओव्हर-ब्रिजवर पोहोचल्यावर त्या व्यक्तीने अन्सारी यांना अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले. अन्सारी यांचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने आपल्या जवळील ५०० च्या नोटांचा बंडल दिला. यातील फक्त दोनच नोटा खऱ्या होत्या. अन्सारी यांनी त्याची विनंती मान्य केली आणि सोन्याचे कानातले आणि चेन त्या माणसाला दिली, ज्याने दागिने रुमालात गुंडाळून महिलेला परत दिले आणि तो आपल्या मुलासह घटनास्थळावरून गायब झाला.

कामावर पोहोचल्यानंतर अन्सारी यांनी रुमाल उघडून पाहिले तर, त्यात दागिन्यांऐवजी दगड होते. हे पाहिल्यानंतर अन्सारी यांना मोठा धक्का बसला. यानंतर अन्सारी यांनी पोलिसांत धाव घेऊन त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली नागरिकांना लुटण्यासाठी अवलंबलेल्या अनोख्या पद्धतींनी पोलीस देखील चक्रावून गेले. तसेच यापुढे कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारची विनंती केल्यास त्याला बळी पडू नये, असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर