Mumbai Govandi News: मुंबईतील गोवंडी येथील रफिक नगर भागातून बेपत्ता झालेल्या तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह ४८ तासांनंतर तिच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या नाल्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा मृतदेह बाहेर काढला. तसेच या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयेशा नेहल खान असे नाल्यात मृतदेह आढळलेल्या मुलीचे नाव आहे. आयेशा ही आपल्या आई-वडिलांसह गोवंडी येथील रफिक नगर परिसरात राहत होती. आयेशाच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आयेशाच्या आईने १० दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिला आहे आणि ती अंथरुणातच आहे. दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वाजताच्या सुमारास आयेशा घराजवळ खेळत असताना अचानक गायब झाली. आयेशाचा शोध घेऊनही ती कुठेच न सापडल्याने घरच्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले, ज्यामध्ये मुलगी ९० फूट नाल्याजवळ खेळताना दिसत होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापुराव देशमुख यांनी पुष्टी केली की, मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबाने ओळखला आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, हा नाला नेहमीच कचऱ्याने भरलेला असतो आणि तो कधीही साफ केला जात नाही. खेळताना नाल्यात पडल्याने आयेशाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या