मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Multibagger Stocks: शेअर म्हणावेत की पैसे दुप्पट करण्याची मशीन? किती नफा मिळवून दिला पाहाच!

Multibagger Stocks: शेअर म्हणावेत की पैसे दुप्पट करण्याची मशीन? किती नफा मिळवून दिला पाहाच!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 16, 2022 03:23 PM IST

Multibagger Stocks: शेअर बाजारात अस्थिरतेचं सावट असतानाही काही कंपन्यांच्या शेअर्सनी अगदी छोट्या कालावधीत गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष गुंतवणुकीपेक्षा अनेक पटी अधिक पैसे मिळवून दिले आहेत.

Return on Stock Investment
Return on Stock Investment

Multibagger Stocks: शेअर बाजारात सध्या प्रचंड चढउतार सुरू असताना काही शेअर्सनी अगदी कमी काळात गुंतवणूकदारांना मालामाल करून टाकलं आहे. सोलेक्स एनर्जी कंपनीचा शेअर यापैकी एक आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल १०७ टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. तर, रिजन्सी सिरामिक्स (१०३), सालासर एक्सटीरियर्स (१०२) आणि A&M जंबो बॅग्स (१०० टक्के) यांनीही गुंतवणूकदारांना खूष करून टाकलं आहे.

सोलेक्स एनर्जी (Solex Energy)

सोलेक्स एनर्जी या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपनीच्या शेअरनं गेल्या वर्षभरात जबरदस्त परतावा दिला आहे. वर्षभरात या शेअर्सनं गुंतवणूकदारांना १ लाखाचे ९ लाख रुपये करून दिले आहेत. परताव्याचे हे प्रमाण तब्बल ८१९ टक्के आहे. सोलेक्स एनर्जीचा शेअरचा ५२ आठवड्यांतील नीचांक ४२.५० रुपये इतका होता, तर याच कालावधीत हा शेअर ४२०.३० रुपयांपर्यंत पोहोचला होता. मागील एका महिन्यात या शेअरनं १५० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

रिजन्सी सिरामिक्स (Regency Ceramics)

बिल्डिंग मटेरियल बनवणाऱ्या रिजन्सी सिरॅमिक्सनं गुंतवणूकदारांना एका वर्षात एक लाखाचे १४ लाख करून दिले आहेत. कंपनीच्या शेअरनं या कालावधीत १३२६ टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात १८३ टक्के परतावा देणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांतील कमाल भाव २७.१० रुपये तर किमान भाव १.८५ रुपये आहे.

सालासर एक्सटेरियर्स आणि कॉन्टूर (Salasar Exteriors and Contour)

सालासर एक्सटेरियर्स आणि कॉन्टूरच्या शेअर्सनीही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी एका महिन्यात ११५ टक्के, तर आठवड्यात १४६ टक्के परतावा दिला आहे. या कंपनीनं वर्षभरात १५५१ टक्के इतका जोरदार परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवणाऱ्यांचा फायदा आता १६.५१ लाख रुपयांपर्यंत गेले आहे. सालासर शेअरचा ५२ आठवड्यांतील कमाल भाव २६३.८५ तर, किमान भाव २० रुपये आहे.

ए अँड एम जम्बो बॅग्ज (A and M Jumbo Bags)

'ए आणि एम जंबो बॅग' कंपनीचे शेअर्स देखील गेल्या अनेक दिवसांपासून चांगले प्रॉफिट मिळवून देत आहेत. ए अँड एमनं वरील तीन कंपन्यांसारखी छप्परफाड कामगिरी केली नसली तरी ६३ टक्के परतावा दिला आहे. तर महिनाभरात या कंपनीच्या शेअरनं उच्चांक गाठला आहे. या कालावधीत त्यानं आपल्या गुंतवणूकदारांना १३६ टक्के परतावा दिला आहे. या शेअरच्या भावाचा ५२ आठवड्यांतील उच्चांक १३.३० रुपये आहे आणि नीचांक ५.०५ रुपये आहे.

 

(सूचना: सदर बातमी ही शेअर बाजारात विविध कंपन्यांच्या शेअर्सनी केलेल्या कामगिरीच्या व आकडेवारीच्या माहितीवर आधारित आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा.)

IPL_Entry_Point

विभाग