बांदा कारागृहात शिक्षा भोगत असताना माफिया डॉन मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोस्टमार्टम अहवाल समोर आला, त्यात मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे म्हटले आहे. मात्र मुख्तारच्या कुटूंबीयांना त्याला स्लो पॉयझन देऊन मारल्याचा आरोप करत आहेत. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. रानी दुर्गावती मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टराच्या पथकाने मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये विषप्रयोग झाला नसल्याचे म्हटले आहे.
पोस्टमार्टम करताना अन्सारीचे कुटूंब आतमध्ये होते व या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडियो रिकॉर्डिंग केले गेले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला असून फोरेंसिक तपासणीसाठी पाठवला जाईल. त्यात समजेल की, विष दिले होते की, नाही.
ईएनटी तज्ज्ञ मुकेश कुमार, महेश गुप्ता, वरिष्ठ शल्यचिकित्सक एसडी त्रिपाठी, हस्तीरोग तज्ज्ञ डॉ. विकासदीप बिलाटिया यांच्या पथकाने जवळपास एक तास पोस्टमार्टम केला. ही प्रक्रिया दुपारी २ वाजता सुरू करण्यात आली. पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये अन्सारी कुटूंबाचा आरोप फेटाळण्यात आला आहे. दरम्यान मुख्य न्यायिक मजिस्ट्रेट (बांदा) भगवान दास गुप्ता यांनी शुक्रवारी मुख्तार यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्तारचा मृत्यू गुरुवार रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी झाला. रात्रीच त्यांचे पोस्टमार्टम होणे आवश्यक होते. मात्र मुलगा उमरच्या अटीनुसार पोस्टमार्टम थांबवले गेले. त्यामुळे मृत्यूच्या १८ तासानंतर पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर तीन तासांनी मृतदेह गाझीपूरला रवाना करण्यात आला. मुख्तारच्या मृत्यूचे बुलेटिन मेडिकल कॉलेजकडून रात्री ९:३७ वाजता जारी करण्यात आले. मुख्तारचे कुटूंबीय गाजीपूरही येत असल्याचे समजताच कमिश्नर, डीआयजी, डीएम आणि एसपीची बैठक झाली. त्यात निर्णय झाला की, कुटूंब आल्यानंतर रात्री पोस्टमार्टम होईल व शुक्रवारी सकाळी मृतदेह पाठवला जाईल. रात्री मुख्तारचा लहान मुलगा आपला चुलत भावांसह वकीलासह पोहोचला. त्याने आरोप केला की, वडिलांना विष देऊन मारले आहे. याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईन. त्यानंतर रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शुक्रवारी दिवसा पोस्टमार्टम करण्याचा निर्णय घेतला.