Mukesh Khanna News : समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या रिअॅलिटी शोमध्ये आई-वडील व मुलांच्या नात्याबद्दल अत्यंत घाणेरडं आणि अश्लील वक्तव्य करणारा यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्यावर अभिनेते मुकेश खन्ना प्रचंड चिडले आहेत. ‘अशा लोकांचं तोंड काळं करून त्यांना गाढवावर बसवून शहरभर फिरवलं पाहिजे,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India's Got Latent) मधील वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) यानं माफी मागितली असली तरी लोक त्याला माफ करायला तयार नसल्याचं दिसत आहे. त्याच्या विरुद्ध देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. केंद्र सरकारनं यूट्यूबला आदेश देत तो एपिसोड ब्लॉ करायला लावला आहे. दुसरीकडं, विविध घटकांकडून अलाहाबादियावर टीकेची झोड उठली आहे.
‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना हे अलाहाबादियाच्या अश्लाघ्य वक्तव्यामुळं खूपच दुखावले आहेत. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे.
'रणवीर अलाहाबादियासारख्या यशस्वी युट्यूबरनं जे भयानक विधान केलं ते दु:खद आहे. आई-वडील आणि सेक्स संबंधित असं काही तरी ते वक्तव्य आहे. यामुळं संपूर्ण देशाला वेदना झाल्या आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या देशातील तरुणांना सध्या अवाजवी अवाजवी स्वातंत्र्य मिळालंय हेच यावरून दिसून येतं. अशा पद्धतीनं मर्यादा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. हा गंभीर गुन्हा आहे. ही गोष्ट सहजपणे घेतली जाऊ नये. भविष्यात अशा प्रकारची अश्लील आणि बेजबाबदार विधानं करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असं मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे.
‘अशा चुकीला शिक्षा म्हणून सार्वजनिक अपमानाचा पर्याय निवडायला हवा. माझ्याकडं अशा लोकांसाठी एक शिक्षा आहे. याचं तोंड काळं करून गाढवावर बसवून यांना संपूर्ण शहरात फिरवा. पुढच्या वेळी असं काही बोलण्याचं धाडस कुणीही करणार नाही,’ असं मुकेश खन्ना यांनी पुढं म्हटलं आहे.
‘मी जे बोललो ते मी बोलायला नको होतं. मला माफ करा. माझी भाषा योग्य नव्हती आणि गंमतीशीरही नव्हती. कॉमेडी हा माझा प्रांत नाही. मी इथं फक्त सॉरी म्हणायला आलो आहे. जे काही घडलं त्यामागे मी कोणताही संदर्भ, औचित्य किंवा युक्तिवाद देणार नाही. मी फक्त माफी मागू इच्छितो,’ असं म्हणणारा व्हिडिओ अलाहाबादियानं 'एक्स'वर पोस्ट केला आहे.
रणवीर विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर आता मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या