Mukesh Ambani meets Rahul Gandhi : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी गुरुवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. तिथंच त्यांनी सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीमुळं चर्चेला उधाण आलं. मात्र, भेटीचं कारण राजकीय नसून कौटुंबिक असल्याचं समोर आलं आहे.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचा सोहळा सुरू झाला आहे. या सोहळ्यासाठी मुकेश अंबानी हे स्वतः देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करत आहेत. त्याच कारणास्तव त्यांनी आज सोनिया व राहुल गांधी यांची भेट घेतली व त्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं.
मुकेश अंबानी आज दिल्लीत होते. त्यांनी तिथं काही मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या व नंतर राहुल गांधी यांच्या १० जनपथ निवासस्थानी पोहोचले. तिथं ते राहुल गांधी व सोनिया गांधी यांना भेटले. मुकेश अंबानी यांनी या दोघांनाही अनंतच्या लग्नासाठी आमंत्रित केल्याची सूत्रांची माहिती आहे.
लग्नाआधीच्या भव्य कार्यक्रमानंतर आता अनंत अंबानी यांचं विधीवत लग्न होणार आहे. येत्या १२ जुलै रोजी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याची तयारी मुंबईतील अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इथं सुरू झाली आहे. लग्नाच्या तयारीत कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. या सोहळ्याला देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.
अंबानी कुटुंबातील या खास सोहळ्याला देशभरातील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड, राजकारण, व्यवसाय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा कार्यक्रम भव्य आणि संस्मरणीय ठरणार आहे.
संबंधित बातम्या