Muhammad Yunus At dhakeshwari Mandir : बांगलादेशामधील अंतरिम सरकारचे सल्लागार मोहम्मद यूनुस यांनी मंगळवारी ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली. त्यांनी येथे हिंदू समुदायाच्या लोकांशी संवाद साधला. यावेळी मायनॉरिटी राइट्स मूव्हमेंटच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाने मोहम्मद यूनुस यांची भेट घेतली. या दरम्यान विद्यार्थ्यांनी मोहम्मद यूनुस यांच्यासमोर आठ सूत्रीय मागण्या ठेवल्या.
मोहम्मद यूनुस यांनी अशा वेळी हिंदू मंदिराचा दौरा केला आहे, ज्यावेळी बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदु लोकांवर हल्ले वाढले आहेत. मोहम्मद यूनुस यांनी ढाकेश्वरी मंदिरात म्हटले की, देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी लोकांमध्ये द्वेष पसरवण्या ऐवजी त्यांना एकजूट करणे आवश्यक आहे. या आव्हानात्मक परिस्थितीचा सर्वांनी धैर्याने सामना करावा.
बांगलादेश सरकारचे हंगामी सल्लागार मोहम्मद युनूस यांनी मंगळवारी एका हिंदू मंदिराला भेट दिली. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, नोबेल पारितोषिक विजेत्याने बांगलादेशची राजधानी ढाका येथील ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिराला भेट दिली.
मंगळवारी ढाकेश्वरी मंदिरात पोहोचल्यानंतर युनूस यांनी बांगलादेश पूजा उद्योग परिषद आणि महानगर सार्वजनिक पूजा समितीचे नेते, तसेच मंदिर व्यवस्थापन मंडळाचे अधिकारी आणि भाविकांशी शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनूस यांना पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले होते की, "आम्ही हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा सुनिश्चित करून लवकर सामान्य परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा करतो."
'अधिकार सर्वांसाठी समान आहेत. आपण सर्व जण एकाच हक्काचे लोक आहोत. आमच्यात कोणताही भेद करू नका. कृपया, आम्हाला मदत करा. संयम बाळगा आणि नंतर ठरवा - आपण काय करू शकलो आणि काय करू शकलो नाही. आम्ही अपयशी ठरलो तर आमच्यावर टीका करा,' असे युनूस यांनी म्हटले आहे.
Viral News : भारताची बदनामी ऐकून कॅब ड्रायव्हरला राग आला! पाकिस्तानी नागरिकाला शिकवला चांगलाच धडा, वाचा
'लोकशाही आकांक्षांमध्ये आपल्याकडे मुस्लिम, हिंदू किंवा बौद्ध म्हणून न पाहता माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. आमचे हक्क सुनिश्चित व्हायला हवेत. सर्व समस्यांचे मूळ संस्थात्मक व्यवस्थेच्या ऱ्हासामध्ये दडलेले आहे. त्यामुळेच असे प्रश्न निर्माण होतात. संस्थात्मक व्यवस्था निश्चित करण्याची गरज आहे,' असे युनूस यांनी सांगितले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन ५ ऑगस्ट रोजी देश सोडल्यानंतर बांगलादेशातील सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय असलेल्या हिंदूंवर हल्ले होत असताना युनूस यांनी मंदिराला भेट दिली.
बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषद आणि बांगलादेश पूजा उद्योग परिषदेने दावा केला आहे की, हसीना सरकार कोसळल्यापासून ५२ जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांवर हल्ल्याच्या २०५ घटना घडल्या आहेत.
बांगलादेशात हिंदूंचे आंदोलन -
हजारो हिंदूंनी गेल्या आठवड्यात ढाका आणि चट्टग्राम मध्ये निदर्शने केली आणि त्यांच्या मंदिरे, घरे आणि व्यवसायांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळावे या मागणीसाठी निदर्शने केली. ढाक्यातील शाहबाग येथे शनिवारी हिंदू आंदोलकांनी तीन तासांहून अधिक काळ वाहतूक रोखून धरली होती.
अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालये, अल्पसंख्याकांसाठी १० टक्के संसदीय जागा आणि अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी युनूस यांच्यांकडे केल्या.
युनूस यांनी शनिवारी हिंसाचारग्रस्त देशात अल्पसंख्याक समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला होता. ते 'घृणित' असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्धांचे रक्षण करण्याचे आवाहन केले होते.
बांगलादेश हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन युनिटी कौन्सिल आणि बांगलादेश पूजा उद्योग परिषद या दोन हिंदू संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यापासून आठवड्याच्या अखेरपर्यंत बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना ५२ जिल्ह्यांत हल्ल्याच्या किमान २०५ घटनांना सामोरे जावे लागले आहे.