MP Blast : मृतदेहांच्या चिंधड्या आणि आगीचे लोळ, फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटात ११ ठार, ६० जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  MP Blast : मृतदेहांच्या चिंधड्या आणि आगीचे लोळ, फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटात ११ ठार, ६० जखमी

MP Blast : मृतदेहांच्या चिंधड्या आणि आगीचे लोळ, फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटात ११ ठार, ६० जखमी

Feb 06, 2024 03:38 PM IST

Madhya Pradesh Harda Blast News : मध्य प्रदेशातील हरदा इथं फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

Madhya Pradesh Harda Blast and Fire Incident
Madhya Pradesh Harda Blast and Fire Incident

Madhya Pradesh Harda Blast Fire News : मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील मगरधा रोडवर असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन नंतर लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हादरवून टाकणारी ही घटना घडली. फटाक्याच्या कारखान्यात एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झाले. एखादा ज्वालामुखी फाटावा इतके हे स्फोट तीव्र होते. स्फोटांचे आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेले. त्यामुळं प्रचंड घबराट उडाली. स्फोटांमुळं परिसरात गोंधळाचं वातावरण पसरलं. आजूबाजूचे लोक घाबरले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं परिसरातील शंभरहून अधिक घरं रिकामी केली आहेत. या स्फोटात ६० हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे.

दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फटाक्यांची दारू आगीच्या संपर्कात आगीनं रौद्र रूप धारण केल्याचं सांगण्यात येत आहे. 

एनडीआरएफ आणि एसडीआरएफला पाचारण

अग्निशमन दलाच्या ५० हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. स्फोटातील पीडितांच्या कुटुंबांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींच्या उपचारासाठी भोपाळ, होशंगाबाद (नर्मदापुरम) आणि इतर ठिकाणी डॉक्टरांचं पथकही तैनात करण्यात आलं आहे. जखमी सरकारी खर्चानं उपचार केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री यादव यांनी दिली आहे.

स्फोट सुरूच आहेत!

हा स्फोट कशामुळं झाला? आधी स्फोट झाला की आधी आग लागली? याबाबत काहीही कळू शकलेलं नाही. मदत व बचावकार्य सुरू असतानाही कारखान्यात अधूनमधून स्फोट होत असून त्यामुळं आग पसरत आहे. स्फोट झालेला कारखाना बेकादेशीररित्या चालवला जात होता. या कारखान्यात सुमारे १५ टन फटाक्याची दारू होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर