Why Israel want Eli Cohen Dead Body : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद जगातील सर्वात घातक गुप्तचर संघटना समजली जाते. या गुप्तचर यंत्रणेचे गुप्तहेर माहिती मिळवण्यात कुशल आहेत. या गुप्तचर संघटनेचा एक स्टार गुप्तहेर होता एली कोहेन. एली कोहेनने इस्रायलसाठी असे कारनामे केले की ज्यामुळे ते इस्रायलसाठी हिरो बनले. १९६५ मध्ये त्यांची हत्या झाली, पण मृत्यूपूर्वी त्यांनी इस्रायलला गुप्त माहिती दिली. ज्यामुळे इस्रायलने १९६७ चे अरब युद्ध अवघ्या ६ दिवसांत जिंकले.
कोहेन यांनी १९६२ मध्ये व्यापारी कामेल अमीन थाबेट म्हणून सीरियात प्रवेश केला. अवघ्या तीन वर्षांत सीरियाच्या बड्या नेत्यांमध्ये ते वावरू लागले. त्यांनी सिरियाच्या सरकारमध्ये असं स्थान निर्माण केलं की त्यांचा शब्द सिरीयन सरकारच्या आदेशासारखा होता. कोहेन यांना सिरियात ५९ वर्षांपूर्वी रस्त्याच्या मधोमध फासावर लटकवण्यात आलं होतं. आज इतक्या वर्षांनंतर इस्रायलने सीरियातून त्याचा मृतदेह परत आणण्याची मागणी तीव्र केली आहे.
कोहेन यांचा मृतदेह सिरियातून पुन्हा इस्रायलमध्ये आणण्यासाठी इस्रायलचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. इस्रायलच्या प्रसिद्ध गुप्तहेरांपैकी एक असलेल्या कोहेन यांनी सीरियाच्या राजकीय आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची मर्जी प्राप्त केली होती. १९६७ च्या सहा दिवसीय अरब युद्धात इस्रायलच्या विजयासाठी त्यांनी महत्वपूर्ण माहिती इस्रायलला पुरविली. मात्र, त्यांचे बिंग फुटले व त्यांना फासावर लटकवण्यात आलं. तब्बल ६० वर्षांपासून इस्रायल त्यांचा मृतदेह परत आण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोहेन यांना नेमकं कुठं दफन करण्यात आलं ते ठिकाण देखील अज्ञात आहे. सीरियाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा मृतदेह लपवण्यासाठी कबरीची जागा अनेकदा बदलली.
कोहेन यांचा मृतदेह परत आणण्यासाठी इस्रायल अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असून सिरियन सरकारला अनेकदा विनंती करूनही इस्रायलला त्यांचा मृतदेह परत मिळवण्यात यश आलं नाही. प्रत्येक वेळी सीरियाने इस्रायलची विनंती फेटाळून लावली. इस्रायलची दिशाभूल करण्यासाठी कोहेन यांचा मृतदेह अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी हलवल्याची कबुली सीरियाने दिली आहे.
एली कोहेन कोहेन यांचा जन्म इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे १९२४ मध्ये एका ज्यू कुटुंबात झाला. १९४८ मध्ये इस्रायलच्या स्थापनेनंतर कोहेन यांचे कुटुंब इस्रायलमध्ये स्थायिक झाले. कोहेन स्वत: १९५७ मध्ये इस्रायलमध्ये स्थायिक झाले. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आणि देशभक्तीनंतर कोहेन यांना इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादमध्ये प्रवेश मिळाला. इस्रायलच्या लष्करी गुप्तचर विभागात काम केल्यानंतर १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला मोसादने कोहेन यांची भरती केली होती. त्याला अरबी, स्पॅनिश आणि फ्रेंच भाषा सहज बोलता येत होती.
संबंधित बातम्या