Monsoon season 2024 : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. यंदा मान्सूनची (Monsoon) लवकरच एन्ट्री होण्याची शक्यता आहे. मान्सून अंदमानमध्ये येण्यास काही दिवस बाकी आहेत. समुद्रावर सध्या ८५० हेक्टा पास्कल इतका दाब आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये वेळेआधीच येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. भारताच्या अनेक भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. वाढत्या गर्मीमुळे अंगाची लाहीलाही होत असताना एक आनंदाची बातमी आहे. मान्सनसाठी यंदा अनुकूल परिस्थिती आहे. येत्या २१ दिवसात मान्सून केरळमध्ये धडकणार आहे.
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार हवेचा दाब मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे यंदा पाऊसमान चांगला राहणार आहे. राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून पाऊसही लवकर येणार असल्याच्या शक्यतेनं शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इंडियन ओशियन डायपोल किंवा IOD आणि ला नीना ची स्थिती लवकरच मान्सूनचे कारण बनू शकते. त्याचबरोबर सांगितले जात आहे की, या घटना देशात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहे. यामुळे शक्यता वर्तवली जात आहे की, मान्सून निर्धारित वेळेपेक्षा आधीच दाखल होऊ शकतो.
हवेचा दाब यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता वर्तवत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवनाची गती वाढली आहे. त्यामुळे हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीस अनुकूल झाला असून सध्या हा दाब ७०० वरून ८५० हेक्टा पास्कलवर गेल्याने मान्सूनच्या हालचालीचे चांगले संकेत मिळाले आहेत.
यंदा समुद्रावर हवेचा दाब मान्सूनसाठी अनुकूल होत आहे, असे निरीक्षण हवामान शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात येण्यास अवघे २१ दिवस उरले आहेत. नैऋत्य मान्सूनची हालचाल आणि नंतरचे मार्गक्रमण हवेच्या दाबावर अवलंबून असते. हवेचा दाब हा समुद्रावर १००० हेक्टा पास्कलवर गेला की मान्सूनची निर्मिती सुरू होते. हवेचा दाब १००६ वर गेल्यानंतर मान्सून अंदमानात दाखल होतो. पुढे हा दाब १००८ वर गेल्यास तो भारतात केरळ किनारपट्टीवर धडकतो. दरवर्षी मान्सून १८ ते २० मेदरम्यान अंदमानात येतो. त्यानंतर हवेचा दाब अनुकूल झाला तर यंदा वेळेआधीच तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी यंदा दिला आहे.
संबंधित बातम्या