Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यापासून माकडांच्या एका गटाने एका व्यक्तीला रोखले. आरोपींनी मुलाला आमिष दाखवून शहरातील एका बेवारस घरात नेल्याची घटना शनिवारी घडली. यूकेजीची विद्यार्थिनी असलेल्या पीडित मुलीने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आणि माकडांनी तिला कसे वाचवले? याची माहिती दिली.
पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ती घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला एका निर्जनस्थळी नेले. त्यानंतर आरोपीने चिमुरडीच्या अंगावरील कपडे काढले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या माकडांच्या एका गटाने आरोपीवर हल्ला केला आणि त्याला पळून जाण्यास भाग पाडले.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 'घराजवळ असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी माझ्या मुलीसोबत फिरताना दिसतोय. मात्र, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत निर्जनस्थळी नेले. परंतु, माकडांनी आरोपीवर हल्ला केला नसता तर चिमुरडीसोबत चुकीचे घडले असते.'
या घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बागपतचे सर्कल ऑफिसर हरीश भदौरिया यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींविरोधात बीएनएस कलम ७४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर), ७६ (महिलेवर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलीस आरोपींची ओळख पटवून त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील बलियायेथील सदर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलांनी सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या दोन मुलांनी मुलीला खेळण्याचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलगी घरी परतल्यानंतर तिच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले पाहून पालकांना संशय आला. त्यांनी त्वरीत तिला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि नंतर शासकीय बालसुधारगृहात पाठविण्यात आले.