मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'एक्स्ट्रा चटणी' मागितली म्हणून मोमो विक्रेत्याने ग्राहकाच्या चेहऱ्यावर केले चाकूने वार

'एक्स्ट्रा चटणी' मागितली म्हणून मोमो विक्रेत्याने ग्राहकाच्या चेहऱ्यावर केले चाकूने वार

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jan 11, 2024 07:11 PM IST

ग्राहकाने एक्स्ट्रा चटणी मागितली म्हणून मोमोज विक्रेत्याने थेट चाकूने वार केल्याची घटना घडली आहे.

momos seller stabs customer
momos seller stabs customer

दिल्लीत एका मोमोज् विक्रेत्याला ग्राहकाने एक्स्ट्रा चटणी मागितली म्हणून चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. पूर्व दिल्लीतील विश्वास नगरजवळ भीकमसिंग कॉलनीत ही घटना घडली असून चाकू हल्ल्यात ३४ वर्षीय ग्राहक गंभीर जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोराचे नाव विकास असे असून त्याने घटनास्थळावरून पळ काढला असून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली असून त्याच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले गेले आहे, अशी माहिती शाहदरा भागाचे पोलिस उपायुक्त रोहित मीना यांनी पत्रकारांना दिली. 

बुधवारी संध्याकाळी दिल्लीतील फरश बाजार पोलीस स्टेशनच्या नियंत्रण कक्षाला चाकू मारण्याच्या घटनेबाबत कॉल आला होता. यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी जवळच्या न्यू संजय अमर कॉलनीत राहणारा ३४ वर्षीय संदीप कुमार हा रक्ताबंबाळ अवस्थेत बसला असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संदिप हा जवळच्या कॉलनीतील रहिवासी आहे. तो विकास नावाचा युवकाच्या चारचाकीवर खाद्यपदार्थांच्या दुकानातून मोमोज खरेदी करण्यासाठी गेला होता. विकासने संदिपला मोमोज आणि त्यासोबत लाल चटणी दिली. संदीपने विकासकडे आणखी सॉसची मागणी केली. मात्र माझ्याकडे सॉसचा मर्यादित साठा असून अधिक ग्राहकांना देण्यासाठी ठेवून दिले असल्याचे सांगून सॉस देण्यास नकार दिला. संदीपने सॉससाठी आग्रह केल्यानंतर मात्र दोघांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळेतच दोघांमध्ये मारामारी सुरू होऊन भांडणाने हिंसक वळण घेतले. विकासने गाडीत लपवून ठेवलेला चाकू आणून थेट संदीपच्या चेहऱ्यावर दोनदा वार केले. परिणामी संदिपच्या चेहऱ्यावर गंभीर झाल्याची माहिती डीसीपी मीना यांनी दिली. 

चाकू मारल्यानंतर मोमोज विक्रेता विकासने घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी जखमी अवस्थेतीव संदीपला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. संदिप हा शाहदरा भागातील भोलानाथ नगरमध्ये मोबाईल चार्जर बनवण्याचे छोटेसे दुकान चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

WhatsApp channel

विभाग