मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Modi 3.0 : मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; मोदी ३.० सरकारच्या शपथविधीची तारीख व वेळ ठरली!

Modi 3.0 : मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; मोदी ३.० सरकारच्या शपथविधीची तारीख व वेळ ठरली!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 07, 2024 02:48 PM IST

Narendra Modi 3.0 Government : टीडीपीचे चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नितीशकुमार यांनी आज संसदेत झालेल्या NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना एनडीएचे नेते बनवण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिले. त्याचबरोबर नव्या सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाची तारीखही जाहीर केली गेली.

मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ, तारीख व वेळ ठरली
मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ, तारीख व वेळ ठरली (AP)

NDA alliance meeting : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. शुक्रवारी एनडीए संसदीय दलाच्या बैठकीत भाजप नेते प्रह्लाद जोशी यांनी सांगितले की, रविवारी (९ मे) नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हा शपथविधी कार्यक्रम असेल.

ट्रेंडिंग न्यूज

आज एनडीएमधील घटक पक्षांची बैठक बोलावली होती. जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित बैठकीत प्रह्लाद जोशी यांनी शपथविधी समारंभाबाबत माहिती दिली. आज एनडीएतील मोठे सहयोगी पक्ष टीडीपी चीफ चंद्राबाबू नायडू आणि जेडीयू नेते नितीश कुमार (JDU's Nitish Kumar) नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्यानंतर आपल्या खासदारांची यादी राष्ट्रपतींना सोपवतील.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनण्याचा प्रस्ताव एनडीएच्या बैठकीत सादर केला गेला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव ठेवला त्यावर सर्वांनी सहमती दर्शवली. या मीटिंगआधी नरेंद्र मोदींनी संविधानाच्या प्रतीला नमन केले. त्यांच्या बाजुला नितीश कुमार आणि चंद्राबाबू दिसले. पंतप्रधान पदासाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव राजनाथ सिंह यांनी सादर केला, त्याला अमित शहा यांनी अनुमोदन दिले. अमित शहा यांनी म्हटले की, ही आमचीच नव्हे तर देशातील १४० कोटी देशाची इच्छा आहे की, मोदींनी पुढच्या पाच वर्षासाठी देशाचे नेतृत्व करावे.

तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, जनता दल युनायटेडचे नेते नितीशकुमार, जेडीएसचे  एचडी कुमारस्वामी आणि एनडीएतील इतर नेत्यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आज झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना 'संसदीय दलाचे नेते म्हणून मान्यता दिली. 

संसद भवनातील संविधान सदनात शुक्रवारी झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची लोकसभेचे नेते, भाजपचे नेते आणि एनडीए संसदीय पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. एनडीएच्या बैठकीला नरेंद्र मोदीही उपस्थित होते.

या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेले पंतप्रधान मोदींचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोदींनी भारतीय राज्यघटनेसमोर वंदन करून बैठकीला उपस्थित राहिले.

तेलुगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू म्हणाले की, आम्ही सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करत आहोत कारण आम्ही आश्चर्यकारक बहुमत मिळवले आहे. मी निवडणूक प्रचारादरम्यान पाहिले की, तीन महिने पंतप्रधान मोदींनी कधीही विश्रांती घेतली नाही. अहोरात्र त्यांनी प्रचार केला आहे. आंध्र प्रदेशात आमच्या तीन जाहीर सभा आणि एक मोठी रॅली झाली. याचा परिणाम आंध्रातील विजयात झाला आहे. 

भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला आकडा पार करण्यात अपयश आल्यानंतर त्यांना आता मित्रपक्ष टीडीपी आणि जेडीयूवर अवलंबून राहावे लागत आहे.

भाजप खासदार राजनाथ सिंह म्हणाले की, मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन करू इच्छितो. आज आम्ही एनडीएचा नेता निवडण्यासाठी आलो आहोत. या सर्व पदांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सर्वात योग्य आहे,'

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले आणि ओडिशातही आम्ही आमचे सरकार स्थापन केले. मला हे सांगताना आनंद होत आहे की, आंध्र प्रदेशातही एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. अरुणाचल प्रदेशातही आम्ही तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. सिक्कीममध्येही एनडीएने आपले सरकार स्थापन केले. आम्हाला आठवते की १० वर्षांपूर्वी एक उदासीन भारत होता, भारताबद्दल असे म्हटले जात होते की येथे काहीही बदलणार नाही आणि आज १० वर्षांनंतर, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली, हाच भारत एक महत्वाकांक्षी भारत बनला आहे आणि विकसित भारताचा संकल्प घेऊन निघाला आहे.

या बैठकीत चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार यांच्यासह अन्य नेत्यांनी मोदींचे स्वागत केले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान उपस्थित होते. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी मोदी आणि एनडीएला पाठिंबा दिला आहे.

बुधवारी एनडीएतील पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्यांनी मोदींना आपला नेता म्हणून निवडले. त्यानंतर मोदी म्हणाले की, एनडीए विकसित भारताच्या निर्मितीसाठी काम करेल.

नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएसंसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.

९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शपथविधी सोहळा होईल, असे जोशी यांनी जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये जमलेल्या एनडीएच्या नेत्यांना सांगितले.

टी-२० वर्ल्डकप २०२४