भारतीय जनता पार्टीने सोशल मीडियावर ‘मोदी का परिवार’ अभियान सुरू केले आहे. काँग्रेसने यावर दावा केला की, विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव अलायंस’ (INDIA) सतत वाढत असल्याने भाजपचे नेते विचलित झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्स वर एक पोस्ट करत म्हटले की, शेतकरी, युवक, बेरोजगार, मजूर लाचार असून देश लुटत आहे मोदींचा खरा परिवार. पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी आरोप केला की, भाजप खासदार अजय मिश्रा टेनी आणि बृजभूषण शरण सिंह पंतप्रधान मोदींचा खरा परिवार आहे.
रविवारी पाटण्यात पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर वैयक्तिक टीका करताना म्हटले होते की, मोदी कोण आहेत, त्यांना तर कुटूंबच नाही. त्यांना मूल नाही. ज्यांना मुले आहेत. त्यांच्यावर परिवारवादाचे आरोप केले जातात. लालूंच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी आज सकाळपासून भाजप नेत्यांनी ‘मैं हूं मोदी का परिवार’ अभियान सुरू केले आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नावासमोर ‘मोदी का परिवार’ हे तीन शब्द जोडले आहेत.
भाजपच्या या अभियानावर राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, शेतकरी कर्जबाजारी, तरुण बेरोजगार, मजुर लाचार आणि देशाला लुटतोय मोदीचा खरा परिवार.
लालू यादव यांच्या टीकेला उत्तर देताना मोदी म्हणाले की, १४० कोटी देशवासीय माझे कुटूंब आहे. हे तरुण माझे कुटूंब आहे.देशातील कोट्यवधी मुली, माता व भगिनी माझे कुटूंब आहे. देशातील प्रत्येक गरीब माझे कुटूंब आहे. ज्यांचे कोणी नाही ते मोदीचे आहेत आणि मोदी त्यांचा आहे. हा भारतच माझे कुटूंब आहे.