Petrol Diesel Price : गॅस सिलिंडर नंतर आता पेट्रोल-डिझेलही स्वस्त होणार? दिल्लीत हालचालींना वेग
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Petrol Diesel Price : गॅस सिलिंडर नंतर आता पेट्रोल-डिझेलही स्वस्त होणार? दिल्लीत हालचालींना वेग

Petrol Diesel Price : गॅस सिलिंडर नंतर आता पेट्रोल-डिझेलही स्वस्त होणार? दिल्लीत हालचालींना वेग

Published Aug 30, 2023 10:49 AM IST

Gas Cylinder Price : केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमती तब्बल २०० रुपयांची कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता इंधनाचेही दर कमी होण्याची शक्यता आहे.

Petrol Diesel Price In India
Petrol Diesel Price In India (HT)

Petrol Diesel Price In India : पाच राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने सामान्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळं जवळपास ११५० रुपयांना मिळणारा सिलिंडर ९०० ते ९५० रुपयांना मिळणार आहे. त्यातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी मोदी सरकारने दिल्लीत हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करून सामान्यांना दिलासा देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. येत्या काही दिवसांतच इंधनाच्या किंमती कमी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती कमी झाल्यामुळं सरकार तेल कंपन्याकडून इंधनाच्या किंमती कमी घेण्याच्या विचारात आहे. याशिवाय गॅस सिलिंडरच्या किंमतीतील चढ-उताराचा परिणाम थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होत असतो. गॅस सिलिंडरच्या किंमती घसरल्याने तेल वाहतुकीचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्यास वाढत्या महागाईत सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याबाबतची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि गॅसच्या किंमती सातत्याने वाढतच आहे. परंतु सामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमती तब्बल २०० रुपयांनी कमी केल्या आहे. त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही होणार आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तेलाच्या किंमती स्थिर असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्यास त्याचा केंद्राच्या तिजोरीवर फारसा परिणाम होणार नसल्याचं बोललं जात आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळं तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किंमती कमी केल्या होत्या. त्यामुळंच आता कच्च्या तेलाच्या किंमतीतील स्थिरतेचा फायदा घेत भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून आवश्यक पावलं उचलली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता गॅस सिलिंडर नंतर इंधनाच्याही किंमती कमी होणार असल्याने सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर