Old Parliament Building : जुन्या संसद भवनाचं आता काय होणार?, मोदी सरकारने सांगितला प्लॅन
old parliament building : अधिवेशनाचं कामकाज आजपासून नव्या संसदेत होणार आहे. त्यामुळं जुन्या संसदेचं काय होणार?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
old parliament building status live : केंद्रातील मोदी सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. देशाच्या नव्या संसदेत आजपासून कामकाजाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज संसदेच्या जुन्या इमारतीतून सुरू झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसदेच्या जुन्या इमारतीला भावूक निरोप दिला होता. त्यानंतर आता संसदेची जुनी इमारत इतिहासजमा होणार आहे. परंतु आता या जुन्या इमारतीचं काय होणार?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातच आता याबाबत केंद्रातील मोदी सरकारने मोठी अपडेट दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भारताच्या इतिहासाची आणि अनेक सरकारांची साक्षीदार असलेल्या संसदेच्या जुन्या इमारतीचं पाडकाम केलं जाणार नसल्याचं मोदी सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जुन्या संसदेच्या इमारतीतील राष्ट्रीय अभिलेखागाराला नव्या संसदेच्या इमारतीत स्थलांतरीत केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि लोकशाहीचं स्मरण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी संसदेच्या जुन्या इमारतीचं जतन व संवर्धन केलं जाणार आहे. संसदीय परिचर्चा, प्रशिक्षण वर्ग आणि अन्य कार्यक्रमांसाठी संसदेच्या जुन्या इमारतीचा वापर केला जाणार आहे. या इमारतीच्या काही भागांचं रेट्रोफिटींग केलं जाणार असून या इमारतीला देशाची पुरातत्त्व संपत्ती जाहीर केली जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितलं आहे.
जुन्या संसद भवनाच्या काही भागांच्या संरचनेची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच काही भागांना संग्रहालय म्हणून घोषित केलं जाणार असल्याचंही हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नव्या संसदेच्या इमारतीची पायाभरणी केली होती. इमारतीचं काम पूर्ण झाल्यानंतर आता आजपासून सर्व खासदार संसदेच्या नव्या इमारतीतून कामकाजाला सुरुवात करणार आहे. संसदेच्या नव्या इमारतीत खासदारांची आसनक्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच सुसज्ज, प्रशस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञनाचा वापर करून नव्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे.