मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Parliament Session : गणेशोत्सव काळात बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन; भाजपवर टीकेची झोड

Parliament Session : गणेशोत्सव काळात बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन; भाजपवर टीकेची झोड

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 31, 2023 06:29 PM IST

special session of parliament : पावसाळी अधिवेशनाचा समारोप होऊन दोन आठवडे उलटत नाहीत तोच केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे.

Parliament of India
Parliament of India

पावसाळी अधिवेशनाचा समारोप होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून हे अधिवेशन होणार असून २२ सप्टेंबरपर्यंत पाच दिवस हे अधिवेशन चालेल. केंद्र सरकारनं तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मात्र, ऐन गणेशोत्सवातच अधिवेशन बोलावल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. विशेष अधिवेशनकाळात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण ५ बैठका होतील, असं जोशी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात होत असलेल्या या विशेष अधिवेशनात सकस चर्चा होईल, असा आशावादही जोशी यांनी व्यक्त केला आहे.

India Mumbai Meet Live: राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा - निरुपम

संसदेचं पावसाळी अधिवेशन २० रोजी सुरू झालं होतं आणि ११ ऑगस्ट रोजी अधिवेशनाचा समारोप झाला होता. मणिपूरच्या मुद्द्यावरून हे अधिवेशन गाजलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मणिपूरच्या मुद्द्यावर उत्तर द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावही मांडला होता. या अधिवेशनात एकूण २३ विधेयकं संमत करण्यात आली होती.

ठाकरेंच्या शिवसेनची टीका

महाराष्ट्रासह देशभरात १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. नेमकं त्याच काळात अधिवेशन बोलावण्यात आल्यानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे. खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. हेच का भाजपचं हिंदुत्व आहे, असा सवाल सावंत यांनी केला आहे.

अजेंडा गुलदस्त्यातच!

पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलेलं असताना विशेष अधिवेशन बोलावण्याचं कारण केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. हे अधिवेशन नवीन संसद भवनात होईल अशीही एक चर्चा आहे. एखादं महत्त्वाचं विधेयक या अधिवेशनात आणलं जाईल की काय, अशीही एक चर्चा आहे.

Bachchu Kadu : भारतरत्न परत करा; सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आमदार बच्चू कडू यांचं जोरदार आंदोलन

अधिवेशनाची वेळ सूचक

संसेदच्या विशेष अधिवेशनाची वेळ सूचक मानली जात आहे. देशभरात केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात वेगवेगळे पक्ष इंडिया आघाडीच्या बॅनरखाली एकत्र आले आहेत. मोदी सरकारला सत्तेवर खाली खेचण्याचा निर्धार या आघाडीनं केला आहे. दुसरीकडं दिल्लीत लवकरच ८ ते १० सप्टेंबर दरम्यान जी २० शिखर परिषद होत आहे. तर, सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा सूचना केल्या आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या विशेष अधिवेशनाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

WhatsApp channel