केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत वृद्धांना मोठी भेट देण्यात आली आहे. आता ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्यावर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे देशातील १२.३ कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार असून याचा ६.५ कोटी वृद्धांना थेट लाभ होणार आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत वर्षाला ५ लाख रुपयांचा विमा कव्हर उपलब्ध आहे.
७० वर्षांवरील वृद्धांना आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आणण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता या मंजुरीनंतर ७० वर्षांवरील सर्व वृद्धांना या योजनेअंतर्गत दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येणार आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत ही एक नवीन श्रेणी असेल. या अंतर्गत सरकार ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधेसह आरोग्य विमा देणार आहे. जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएमजेएवाय) अंतर्गत उत्पन्नाची पर्वा न करता ७० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे साडेचार कोटी कुटुंबांना कौटुंबिक आधारावर पाच लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
एबी-पीएमजेएवाय आधीच सुमारे ५५ कोटी लोकांना मोफत आरोग्य सेवा देत आहे. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना आहे, ज्याचे उद्दीष्ट १२ कोटी कुटुंबांना मध्यम आणि तृतीयक रुग्णालयात दाखल होण्यास मदत करण्यासाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण प्रदान करणे आहे.
या नव्या घोषणेनंतर आता ७० वर्षांवरील वृद्धांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेला संबोधित करताना म्हटले होते की, ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना मोफत उपचार मिळावेत, हा सरकारचा उद्देश आहे. या निर्णयामुळे वृद्धांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणार असून त्यांच्या उपचाराचा बोजा त्यांच्या कुटुंबियांवरील ताण कमी होणार आहे.