मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manoharlal khattar resign : हरयाणाच्या राजकारणाला कलाटणी; मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

Manoharlal khattar resign : हरयाणाच्या राजकारणाला कलाटणी; मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 12, 2024 12:50 PM IST

Haryana CM Resignation : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manoharlal Khattar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Haryana chief minister Manohar Lal Khattar (L) and his deputy Dushyant Chautala. (PTI file)
Haryana chief minister Manohar Lal Khattar (L) and his deputy Dushyant Chautala. (PTI file)

Haryana Politics : आगामी लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’चा नारा देणाऱ्या भाजपला हरयाणात राजकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर जननायक जनता पक्षानं साथ सोडल्यामुळं भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manoharlal Khattar) यांनी राजीनामा दिला आहे. आता तिथं काय घडामोडी घडणार याकडं लक्ष लागलं आहे. 

हरयाणाच्या विधानसभेतील ९० जागांपैकी भाजपकडं ४१ जागा आहेत. जननायक जनता पक्ष आणि अपक्षाच्या पाठिंब्यावर तिथं भाजपनं सत्ता स्थापन केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून भाजप आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपी यांच्यात मतभेद निर्माण झाले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपनं राज्यातील लोकसभेच्या सर्व १० जागा जिंकल्या होत्या. त्यामुळं जेजेपीला फारसं काही देण्याची भाजपची तयारी नव्हती. त्यातून मतभेद वाढले आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर राजीनाम्याची वेळ आली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी या नावाची चर्चा

विधानसभेत ४१ आमदार, ५ अपक्ष आमदार आणि हरयाणा लोकहित पक्षाचे आमदार गोपाल कांडा यांचा पाठिंबा असल्यानं हरयाणात भाजपचं सरकार कायम राहणार आहे. खट्टर यांच्या जागी आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

अपक्ष आमदार नयनपाल रावत, धर्मपाल गोंडर यांनी भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. हरियाणा लोकहित पक्षाचे आमदार गोपाल कांडा यांनी भाजप आणि जेजेपी यांच्यातील युती तुटण्याच्या टप्प्यावर असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, भाजप स्वबळावर राज्यातील लोकसभेच्या सर्व १० जागा जिंकेल, असंही ते म्हणाले होते. त्यामुळं सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट आहे. 

राजकीय हालचालींना वेग

भाजप आणि जननायक जनता पार्टी या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वानं आपापल्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्या आहेत. त्यापूर्वी मनोहरलाल खट्टर आपल्या निवासस्थानी भाजपच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्यासह भाजपचे केंद्रीय नेते हरयाणात दाखल झाले असून पुढील नेतृत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point