MK Stalin On Modi : '..तर तुम्ही एकटे पडाल', तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा बजेटवरून मोदींना इशारा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  MK Stalin On Modi : '..तर तुम्ही एकटे पडाल', तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा बजेटवरून मोदींना इशारा

MK Stalin On Modi : '..तर तुम्ही एकटे पडाल', तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा बजेटवरून मोदींना इशारा

Jul 24, 2024 11:42 PM IST

MK Stalin Warns Modi : लोकसभा निवडणुकीत ज्यांनी तुम्हाला पराभूत केले त्यांचा बदला पंतप्रधान मोदी घेत असल्याचा आरोप एमके स्टॅलिन यांनी केला आहे.

 तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (PTI)
 तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (PTI)

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे की, जर त्यांनी आपल्या राजकीय आवडी-निवडीनुसार सरकार चालवले तर ते एकटे पडतील. बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीवरून पंतप्रधानांवर टीका करताना स्टॅलिन यांनी म्हटले की, आपल्या मित्रपक्षांना शांत करून पंतप्रधान मोदी आपली सत्ता वाचवू शकतात पण देश वाचवू शकत नाहीत.

अर्थसंकल्पात केंद्राने इतर राज्यांशी भेदभाव केल्याचा आरोप करत विरोधकांनी राज्यसभेत सभात्याग केल्यानंतर काही तासांतच त्यांनी हा  हल्लाबोल केला आहे.

एमके स्टॅलिन  म्हणाले की,  लोकसभा निवडणुकीत ज्यांनी त्यांना पराभूत केले त्यांचा बदला पंतप्रधान मोदी घेत आहेत. केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालात अनेक राज्यांना वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या खासदारांनी निदर्शने केली आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्हणाले, "निवडणूक संपली, आता आपल्याला देशाचा विचार करावा लागेल." पण कालचे #Budget2024 तुमची सत्ता वाचवेल, भारत नाही! सर्वसाधारणपणे सरकार चालवा. ज्यांनी तुम्हाला पराभूत केले आहे त्यांचा बदला घेण्यास उद्युक्त होऊ नका. आपल्या राजकीय आवडी-निवडीनुसार सरकार चालवले तर तुम्ही एकटे पडाल, असा  इशारा त्यांनी दिला आहे. स्टॅलिन यांनी तामिळ भाषेत 'एक्स'वर पोस्ट लहिली आहे.

दरम्यान, द्रमुकचे खासदार दयानिधी मारन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमके स्टॅलिन यांचे अनुसरण केले पाहिजे आणि ज्यांनी त्यांना मतदान केले नाही त्यांच्यासाठी काम केले पाहिजे.

"मला वाटते की पंतप्रधानांनी आमचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याकडून काही चांगला सल्ला घेण्याची आणि त्यांचे अनुसरण करण्याची वेळ आली आहे. एमके स्टॅलिन जेव्हा तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते म्हणाले होते - मी केवळ मला मतदान केलेल्या लोकांसाठीच नाही तर ज्यांनी मला मतदान केले नाही त्यांच्यासाठी देखील काम करेन, हे माझे कर्तव्य आहे. आज पंतप्रधान आपल्या पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांसाठी काम करत नाहीत, तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांसाठीच काम करत आहेत, असे मारन म्हणाले.

राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, २०२४-२५ (एप्रिल २०२४ ते मार्च २०२५) आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांसाठी निधी आणि योजनांची तरतूद करण्यात आली आहे. इतर सर्व राज्यांचा त्यात उल्लेख नाही, हा अर्थसंकल्प म्हणजे खुर्ची बचाओ प्रयत्न आहे. 

अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहार व आंध्रासाठी भरीव तरतूद केली. विशेष दर्जा मिळावा यासाठी दोन्ही राज्ये सरकारवर दबाव आणत होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर