तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत. या फेरबदलानुसार मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन (udhayanidhi) यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. राजभवनाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, उदयनिधीयांचा शपथविधी सोहळा रविवारी पार पडणार आहे.
या फेरबदलाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सेंथिल बालाजी यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन. बालाजी यांच्याकडे यापूर्वी ऊर्जा, उत्पादन शुल्क खाते देण्यात आले होते. मनी लाँड्रिंगच्या आरोपांमुळे बालाजी यांना मंत्रिमंडळातून काही काळासाठी काढण्यात आले होते. पण आता त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात उदयनिधी यांनी आपण उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावत असे निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगितले होते. बुधवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'उपमुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. प्रसारमाध्यमांनी माझ्या नावाची घाई करू नये.
मात्र, उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्रीपदी लवकरच घोषणा होऊ शकते, असे संकेत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री अनबरासन यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात येणार असून आठवडाभरापासून दहा दिवसांत सरकार याबाबतची घोषणा करेल, असे ते म्हणाले होते.
उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती ही तामिळनाडूच्या राजकारणातील द्रमुकची दीर्घकालीन रणनीती मानली जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला असून, पक्ष आपली ताकद आणखी बळकट करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. उदयनिधी आतापर्यंत युवा कल्याण मंत्री म्हणून काम करत होते, आता ते नवी जबाबदारी आणि भूमिका घेऊन पुढे येणार आहेत.
राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षावर पकड मजबूत करण्याच्या रणनितीच्या भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे. या निर्णयामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांचे नेतृत्व आणखी मजबूत होईल. तसेच या नियुक्तीमुळे स्टॅलिन यांनी आपला उत्तराधिकारी देखील निश्चित केल्याचे स्पष्ट होत आहे. उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री करण्यासोबत मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी व्ही.सेंथिल बालाजी, डॉ.गोवी.चेझियान, आर राजेंद्रन, थिरु एनएम नासर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.