israel attack iran : इस्रायलने इराणवर आज सकाळी हवाई हल्ला करून १ ऑक्टोबर रोजी इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा बदला घेतला आहे. इराणने इस्रायलवर तब्बल २०० आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले होते. त्यानंतर इस्रायल या हल्ल्याला कधी उत्तर देणार या कडे सर्व जगाचे लक्ष लागून होते.
इस्रायलच्या लष्कराने आज शनिवारी सकाळी इराणच्या लष्करी तळांवर भीषण हवाई हल्ला केला. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, १ ऑक्टोबरला इराणच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे. इस्रायलने म्हटले आहे की, सर्व सार्वभौम देशांप्रमाणे आपल्यालाही स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. आपले उद्दिष्ट पूर्ण झाल्याचेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे. दरम्यान, इराणने आपली हवाई हद्द बंद केली आहे. त्याचबरोबर इराकनेही आपली उड्डाणे रद्द केली आहेत. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये संपूर्ण युद्धाचा धोका वाढला आहे. मध्यपूर्वेतील इराणसमर्थित अतिरेकी गट गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांच्याशी सध्या इस्रायल लढत आहे. दरम्यान, इराणने देखील इस्रायल चोख उत्तर देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन न्यूज चॅनेल फॉक्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या काही वेळापूर्वी व्हाईट हाऊसला याची माहिती मिळाली होती.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन मध्यपूर्वेतील शांततेसाठी इस्रायलमध्ये दाखल होत असताना हा हल्ला करण्यात झाला आहे. इस्रायलने शनिवारी सकाळी सीरियावरही बॉम्बहल्ला केला, ज्याचे आवाज दमास्कसमध्ये ऐकू आले. इस्रायलने सप्टेंबरच्या अखेरीपासून सीरिया आणि लेबनॉनविरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. इस्रायलच्या म्हणण्यानुसार त्यांनी हिजबुल्लाहचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ही कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, शुक्रवारी पत्रकारांच्या कॅम्पवर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्यात काही पत्रकार ठार झाले होते. या हल्ल्यामुळे इस्रायलवर टीका केली जात आहे.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने मोठं पाऊल उचललं आहे. इराक इराण इराणच्या नागरी हवाई वाहतूक संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले की, इराणमधील सर्व मार्गांवरील उड्डाणे पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. त्याचवेळी इराकनेही विमानसेवा बंद केली आहे. इराणची राजधानी तेहरान आणि आसपासच्या भागात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराकने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, इराण-इराकच्या एका गटाने इस्रायलवरील ड्रोन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. तर निमसरकारी वृत्तसंस्था तानसिमने दिलेल्या माहितीनुसार, इराणही इस्रायलवर प्रतिहल्ल्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये आपला सहभाग असल्याचा दावा अमेरिकेने फेटाळून लावला आहे. अमेरिकेच्या एका संरक्षण अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितले की, इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. १ ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलच्या लक्ष्यांवर सुमारे १८० क्षेपणास्त्रे डागली होती. तेहरानने त्यावेळी म्हटले होते की, हे हल्ले इतर गोष्टींबरोबरच प्रादेशिक प्रतिकार गटांच्या अनेक नेत्यांच्या हत्येचा बदला आहे. इराणच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणने गंभीर चूक केली असून सूड घेण्याची ग्वाही दिली आहे.
संबंधित बातम्या