इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. लेबनॉनमधील घरांमध्ये सापडलेल्या शस्त्रास्त्रांमुळे इस्रायलचा संताप अनावर झाला आहे. हिजबुल्लाहने क्रूझ क्षेपणास्त्रे, रॉकेट्स आणि ड्रोन सारखी धोकादायक शस्त्रे लेबनॉनच्या घरांमध्ये मोठ्या शस्त्रास्त्रांसह लपवून ठेवल्याचा दावा इस्रायलने केला आहे. यासंदर्भात इस्रायलने काही फोटोही जारी केले आहेत, त्यातील एका फोटोमध्ये लांब पल्ल्याचे रॉकेट हायड्रोलिक लाँचरवर ठेवलेले दिसत आहे. ही छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर इस्रायली लष्कराने हिजबुल्लाह विरोधात हल्ले तीव्र केले आहेत.
इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लेबनॉनच्या विविध भागात हल्ले करून अनेक धोकादायक शस्त्रांना लक्ष्य केले आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी म्हटले आहे की, इस्रायल गेल्या २० वर्षांत हिजबुल्लाहने बांधलेल्या पायाभूत सुविधा नष्ट करत आहे. आतापर्यंत हिजबुल्लाहच्या १६०० हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत, ज्यात हिजबुल्लाहने आपली शस्त्रे लपवून ठेवली होती.
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हागरी यांनी सांगितले की, हिजबुल्लाहने लेबनॉनच्या दक्षिण भागाला युद्धक्षेत्र बनवले आहे. इस्रायलच्या लष्कराने लेबनानी नागरिकांना इशारा दिला आहे की, हिजबुल्लाहने ज्या भागात आपली शस्त्रे लपवून ठेवली आहेत, ते क्षेत्र सोडावे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनच्या नागरिकांना आश्वासन दिले आहे की, त्यांचा संघर्ष हिजबुल्लाहसोबत आहे, लेबनॉनच्या लोकांशी नाही. नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी पावले उचलावीत आणि हिजबुल्लाहपासून अंतर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत ५५८ लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये ५० मुले आणि ९४ महिलांचा समावेश आहे. याशिवाय १, ८३५ हून अधिक लोक जखमी झाले असून हजारो लोक सुरक्षित ठिकाणांच्या शोधात आपले घर सोडून पळून गेले आहेत. स्थानिकांसाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. बैरूतचे रहिवासी हसन ओमर म्हणाले, "जोपर्यंत शेजारी इस्रायलसारखा देश आहे, तोपर्यंत आपण सुरक्षित पणे झोपू शकत नाही. दक्षिण लेबनॉनमधील टॅक्सी चालक अफीफ इब्राहिम याने इस्रायलबद्दल आपला संताप व्यक्त करताना म्हटले की, "त्यांना (इस्रायली) आम्हाला झुकवायचं आहे. परंतु आम्ही फक्त अल्लाहपुढे नतमस्तक आहोत.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख व्होल्कर तुर्क आणि व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी संघर्ष कमी करण्यासाठी राजनैतिक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. इस्रायल आणि लेबनॉनमधील तणाव चर्चेच्या माध्यमातून सोडवता येईल, अशी आशा सुलिव्हन यांनी व्यक्त केली आहे. मात्र, हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरूच ठेवले असून मंगळवारी इस्रायलच्या लष्करी तळावर नव्या 'फादी ३' रॉकेटचा वापर केला. तर दुसरीकडे इस्रायली लष्करानेही हिजबुल्लाहवरील हल्ले तीव्र करण्याची भाषा केली आहे.