Miss World 2024 : चेक रिपब्लिकची Krystyna Pyszkova ठरली मिस वर्ल्ड २०२४
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Miss World 2024 : चेक रिपब्लिकची Krystyna Pyszkova ठरली मिस वर्ल्ड २०२४

Miss World 2024 : चेक रिपब्लिकची Krystyna Pyszkova ठरली मिस वर्ल्ड २०२४

Mar 10, 2024 12:01 AM IST

Miss World 2024: चेक रिपब्लिकची २४ वर्षीय क्रिस्टीना पिस्जकोवा (Krystyna Pyszková) हिने विश्व सुंदरी २०२४ स्पर्धा जिंकली आहे. ११५ देशातील सौंदर्यवतींना मागे टाकून ती ७१ वी विश्वसुंदरी ठरली आहे.

Krystyna Pyszková wins Miss World 2024.
Krystyna Pyszková wins Miss World 2024. (Instagram)

मुंबईतील जिओ वर्ल्डमध्ये पार पडलेल्या विश्व सुंदरी २०२४ स्पर्धेची विजेती चेक रिपब्लिकची २४ वर्षीय क्रिस्टीना पिस्जकोवा (Krystyna Pyszková) ठरली आहे. तिने मिस वर्ल्डचा मुकूट आपल्या नावावर केला आहे. दरम्यान लेबनानची यास्मीना फर्स्ट रनर अप राहिली. भारताची सिनी शेट्टी हिने मिस वर्ल्ड २०२४ च्या फिनालेमधील टॉप ८ लिस्टमध्ये स्थान मिळवले होते. मात्र ती विजेतेपद मिळवू शकली नाही.

 माजी मिस वर्ल्ड २०२२ करोलिना बिलावस्का हिने पिस्जकोवा हिच्या डोक्यावर मिस वर्ल्ड २०२४ चा मुकूट घातला. मिस वर्ल्ड २०२४ चा ग्रँड फिनाले आज (९ मार्च) मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडला. 

मिस वर्ल्ड फिनाले २०२४ ला १२ परीक्षकांच्या एका पॅनलने जज केले. यामध्ये चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला, क्रिकेटपटू हरभजन सिंह, अभिनेत्री कृति सेनन, अमृता फडणवीस यांचा समावेश होता.

११५ देशांच्या सौंदर्यवतींनी घेतला सहभाग -

यावेळी ११५ देशांच्या सुंदरींनी स्पर्धेत सहभाग घेतला. मिस वर्ल्ड २०२४ च्या ग्रँड फिनाले इव्हेंटचे आयोजन करण्याची संधी भारताला २८ वर्षानंतर मिळाली होती. भारताने १९९६ मध्ये शेवटची मिस वर्ल्ड स्पर्धेचे यजमानपद भुषविले होते. 

अंतिम राउंडमध्ये सिनी शेट्टी बाहेर -

फिनाले राउंडपर्यंत पोहोचणारी भारताची सिनी शेट्टी सर्वाधिक चर्चेत होती. शेट्टीकडून अपेक्षा होती की, ती यावेळी देशाला मिस वर्ल्ड विजेतेपद मिळवून देईल. मात्र अंतिम राउंडमध्ये ती विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडली. सिनीने यापूर्वी मिस फेमिना २०२२ चे विजेतेपद जिंकले होते.

कोण आहे क्रिस्टीना पिस्जकोवा?

क्रिस्टीना पिस्जकोवा  एक विद्यार्थिनी, स्वयंसेवक आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल आहे. २४ वर्षीय क्रिस्टीना पिस्जकोवा मॉडेलिंग करत असताना कायदा आणि बिझनेस एडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये पदवी शिक्षण घेत आहे. तिने Krystyna Pyszko Foundation ची स्थापना केली असून तिने अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेत असते. मिस वर्ल्ड आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टिनाचा सर्वात अभिमानाचा क्षण म्हणजे टांझानियामध्ये वंचित मुलांसाठी इंग्रजी शाळा सुरू करणे आहे. तेथे तिने स्वयंसेवा देखील केली आहे. तिला ट्रान्सव्हर्स बासरी आणि व्हायोलिन वाजवण्याचा छंद आहे. तसेच तिला संगीत आणि कलेची आवड असून कला अकादमीमध्ये तिने ९ वर्षे प्रशिक्षण घेतले आहे.

 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर