Viral News : स्वित्झर्लंडमधील माजी ब्युटी क्वीनची तिच्या पतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिस स्वित्झर्लंडची फायनलिस्ट असलेली क्रिस्टीना जोक्सिमोविच हिची बासेलजवळील बिनिंगेनमध्ये हत्या करण्यात आली. क्रिस्टीनाची तिच्या पतीने आधी गळा दाबून हत्या केली. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या पतीने तिच्या शरीराचे तुकडे केले. हे तुकडे घरातील मिक्सरमध्ये टाकून त्यात ॲसिडमध्ये टाकून बारीक करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. क्रिस्टीनाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह एका नागरिकांला दिसल्यावर या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
फेब्रुवारीमध्ये क्रिस्टीनाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वी आरोपी पतीने तिची गळा दाबून हत्या केली. थॉमस असे तिच्या पतीचे नाव आहे. त्याने हत्येची कबुली दिली आहे. स्विस मीडिया आउटलेट एफएम१ टुडेने दिलेल्या वृत्तानुसार थॉमसने पत्नीची हत्या केल्यावर करवत, चाकू आणि बागेतील कैचीच्या साह्याने तिच्या शरीराचे तुकडे केले. यानंतर त्याने तिचे शरीराचे तुकडे हे हँड ब्लेंडरच्या साह्याने ॲसिड टाकून बारीक केले. ही बाब उघडकीस येताच तपास अधिकारी देखील चक्रावून गेले.
स्वतःला वाचवण्यासाठी ही हत्या केल्याचा दावा पती थॉमसने केला आहे. क्रिस्टीनाने आपल्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप त्याने केला आहे. मात्र, वैद्यकीय अहवालात हे सिद्ध होऊ शकले नाही. लॉसने येथील न्यायालयाने आरोपीच्या सुटकेचे सर्व अपील फेटाळले. कोर्टाच्या म्हणण्यानुसार आरोपीची मानसिक स्थिती वाईट आहे.
क्रिस्टीना आणि थॉमस यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. दोघेही एका मोठ्या घरात चांगले जीवन जगत असतांना क्रिस्टीनाने घटनेच्या ४ आठवड्यांपूर्वी स्वतःचे काही फोटो देखील पोस्ट केले होते. मात्र, दोघांच्याही एका मित्राच्या म्हणण्यानुसार त्यांचे वैवाहिक जीवन काही महिन्यांपासून चांगले नव्हते. कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात पोलिसांना यापूर्वी त्यांच्या घरी बोलावण्यात आले होते, असे एका अहवालात म्हटले आहे. या हत्येमुळे खळबळ उडाली आहे.