Bomb Threat News: दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास मीरा-भाईंदर वसई विरार पोलिस नियंत्रण कक्षाला फोनद्वारे दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता धमकीचा फोन बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर पोलिसांनी आरोपीचा कॉल ट्रेस करत त्याला ताब्यात घेतले.आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास शुक्ला (वय, ३५) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने शनिवारी पहाटे मीरा-भाईंदर नियंत्रण कक्षाला दादर आणि कल्याण रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. यानंतर मुंबई पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा कॉल बनावट असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.
आरोपीला अटक केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीची पत्नी १८ महिन्यांपूर्वी त्याला सोडून कल्याणमध्ये राहायला गेली. कामानिमित्त ती दररोज कल्याण ते दादर असा प्रवास करत असे. यामुळे त्याने कल्याण आणि दादर ल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली, अशी माहिती पोलिसांना दिली. अटकेवेळी आरोपी दारूच्या नशेत होता. त्याच्याविरुद्ध खोटी माहिती आणि अफवा पसरवल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.