भारतात विविध राजकीय पक्षांना कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक देणग्या कोण देतो, असा प्रश्न सतत विचारला जात असतो. आता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात कोणत्या राजकीय पक्षाला किती कोटी रुपयाची देणगी मिळाली याचा तपशील जाहीर केला आहे. राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्सद्वारे या देणग्या मिळाल्या आहेत. हैदराबाद येथील मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर, पुण्यातील अदार पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया या कंपन्या सर्वात मोठ्या राजकीय देणगीदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतातील सर्व राजकीय पक्षांना मिळालेल्या एकूण ३६६ कोटी रुपयांच्या निधीपैकी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे २५९ कोटी रुपये मिळाले आहे. एकूण राजकीय देणग्यांपैकी ७० टक्के देणग्या या एकट्या भाजपच्या वाट्याला गेल्या असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. एकट्या प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट नावाच्या देणगीदार संस्थेने भाजपला २५६ कोटी रुपयाची देणगी दिली आहे. प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टने २०२१-२२ या आर्थिक वर्षात भाजपला ३३६ कोटी रुपयांची देणगी जाहीर केली होती.
२०२१-२२ या वर्षात निवडणूक रोख्यांद्वारे १,०३३ कोटी रुपये प्राप्त झाल्याचे भारतीय जनता पक्षाने जाहीर केले होते. तर इतर देणग्यांद्वारे ६१४ कोटी रुपये भाजपला प्राप्त झाले होते. ‘समाज ईटी असोसिएशन’ नावाच्या ट्रस्टने भाजपला दीड कोटी रुपये तर कॉंग्रेसला ५० लाख रुपयांची देणगी दिल्याचे उघड झाल आहे.
देशातील पाच इलेक्टोरल ट्रस्टना विविध कॉर्पोरेट कंपन्यांकडून ३६६ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून एकट्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला ९० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. तर आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, दिल्लीची आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षाला एकत्रितपणे १७.४० कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालात नमूद केले आहे.
२२-२३ या वर्षात भारतातील कॉर्पोरेट्स कंपन्यांपैकी मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील शीर्ष देणगीदार म्हणून उदयास आले आहे. मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरने सर्वाधिक ८७ कोटी रुपये, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ५०.२५ कोटी रुपये आणि आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेडने ५० कोटी रुपये विविध राजकीय पक्षांना देणगी म्हणून दिले आहे.
तेलंगणातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगपतींनी १४५.५१ कोटी रुपये, महाराष्ट्रातून १०५.२५ कोटी रुपये, गुजरातमधून ५०.२० कोटी रुपये, पश्चिम बंगालमधून ३०.०८ कोटी रुपये, हरियाणामधून १० कोटी रुपये, तामिळनाडूमधून ७ कोटी रुपये, मध्य प्रदेशातून ६.५ कोटी रुपयांच्या देणग्या देण्यात आल्या आहेत.