हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील बाधरा तालुक्यात हंसवास येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कचरा वेचणाऱ्या तरुणाने गायीचे मांस शिजवून खाल्ल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. या २६ वर्षीय कचरावेचकाच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेले मांस हे गोमांस नव्हते, असं हरियाणा पोलिसांना प्राप्त झालेल्या फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.
कचरा वेचण्याचं काम करणारे साबिर मलिक आणि त्याचा साथीदार असीरुद्दीन या तरुणांनी गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी २७ ऑगस्ट रोजी त्यांना जबर मारहाण केली होती. या हल्ल्यात जखमी झालेला साबिर मलिक याचा मृत्यू झाला होता अशी माहिती बाधराचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) भारत भूषण यांनी दिली.
भारत भूषण म्हणाले, 'हंसवास गावातील या तरुणांच्या झोपडीतून आम्ही मांस जप्त केले होते. ते गोमांस आहे की याची खातरजमा करण्यासाठी फरिदाबाद येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याबाबतचा अहवाल आम्हाला नुकताच प्राप्त झाला आहे. त्या तरुणांनी शिजवलेले मांस हे गोमांस नसल्याची पुष्टी अहवालातून झाली आहे. गोमांस शिजवल्याचा गोरक्षकांनी केलेला आरोप खरा नाही, असे भारत भूषण यांनी पुढे सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. तर सहा जण अद्याप फरार आहे. या आरोपींविरुद्ध आम्ही न्यायालयात लवकरच आरोपपत्र सादर करणार असून त्यासोबत प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेला अहवाल जोडण्यात येईल असं डीएसपी भारत भूषण यांनी सांगितले.
साबिर मलिक हा तरुण त्याची पत्नी शकिना मलिक आणि दोन वर्षांच्या मुलीसोबत हंसवास खुर्द गावात राहत होता. गोरक्षकांच्या हल्ल्यानंतर या परिसरात दहशत निर्माण झाली असून पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातून या भागात नोकरीसाठी आलेली इतर दोन कुटुंबे आधीच आपल्या मूळ गावी परतली आहेत.
साबिर मलिक या तरुणाचा मेहुणा सूरजुद्दीन सरकार याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन जण त्यांच्या झोपडीत शिरले. त्यांनी साबिरला सोबत येण्यास सांगितले. त्यांनी बाधरा बसस्थानकाजवळ नेऊन साबिरला मारहाण करण्यास सुरूवात केली होती. नंतर त्याला आणखी दुसऱ्या ठिकाणी नेण्याच आले. पोलिसांनी मला आणि माझ्या वडिलांना बाधरा पोलीस ठाण्यात बोलावले होते. आम्ही गोमांस खाल्ले नसल्याचे पोलिसांना सांगितले. साबिर घरी परत आला नसल्याचे माझ्या बहिणीने मला फोन करून सांगितले. याची आम्ही पोलिसांना माहिती दिली. त्याच दिवशी संध्याकाळी माझा मेहुणा साबिर मृतावस्थेत आढळला होता. साबिर मलिक याच्या मृत्यूनंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी या घटनेचा निषेध करत गोरक्षणाबाबत राज्याच्या भूमिकेचा मात्र बचाव केला आहे.
‘मॉब लिंचिंग योग्य नाही. पण जेव्हा अशा घटना [कथित गोमांस खाण्याच्या] समोर येतात तेव्हा खेड्यापाड्यातील लोक प्रतिक्रिया देतात,’ असं मुख्यमंत्री सैनी यांनी ३१ ऑगस्टला माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. गायींच्या रक्षणासाठी आम्ही विधानसभेत कडक कायदा केला असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री सैनी म्हणाले होते.