armenia azerbaijan disputed territory : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळं जगाची चिंता वाढलेली असतानाच आता युरोपातील आणखी दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागोर्नो काराबाख प्रांतावरील वर्चस्वाच्या लढाईसाठी अजर्बैजानने आर्मेनियावर हल्ला केला असून त्यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता आर्मेनियानेही अजर्बैजानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून दोन्ही देशांनी एकमेकांवर बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अजर्बैजानने नागोर्नो काराबाख प्रांतात दहशतवाद विरोधी कारवाया सुरू केल्याच्या कारणावरून दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये सतत संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे.
अजर्बैजानने आर्मेनियावर केलेल्या हल्ल्यात सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मिसाईल तोफांनी हल्ला करण्यात आला असून त्यात मोठ्या प्रमाणात संपत्तीचं नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आर्मेनियाने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं सांगत अजर्बैजानला जशास तसं उत्तर दिलं जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दोन्ही देशांच्या जवानांनी एकमेकांवर तुफान गोळीबार सुरू केला आहे. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये १९९० आणि २०२० साली तुंबळ युद्ध झालं होतं. त्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटताच अमेरिका, रशिया आणि तुर्कस्थान या देशांनी मध्यस्थी करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
अजर्बैजान या देशाला तुर्कस्थानचा पाठिंबा आहे. आर्मेनियाला युरोपियन देशांचं समर्थन आहे. दोन्ही देश १९ व्या शतकात USSR मध्ये होते. त्यामुळं दोन्ही देशांच्या संघर्षात रशियात नेहमीच मध्यस्थी करत आलेला आहे. परंतु रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असल्यामुळं या देशांवर त्याचा मोठा प्रभाव पडणार आहे. अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधींनी दोन्ही देशांना चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलं असून तातडीने वादग्रस्त प्रांतात शांती बहाल करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं आता हे युद्ध थांबणार की वाढणार?, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.