Haryana Violence News Updates : नूह जिल्ह्यात शोभायात्रेत झालेल्या वादानंतर संपूर्ण हरयाणात हिंसाचार सुरू झाल्याच्या घटना समोर येत आहे. नूह, मेवात, गुरुग्राम आणि फरीदाबाद या जिल्ह्यांमध्ये धार्मिक हिंसाचार होत असल्याचं दिसून येत आहे. हरयाणातील हिंसाचारात आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. त्यातच आता नूह जिल्ह्यात दोन प्रार्थनास्थळांना आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नसून शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आता हरयाणातील हिंसाचारग्रस्त भागांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणातील नूह जिल्ह्यातील दोन प्रार्थनास्थळांना आग लागली असून त्यात काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. एका धार्मिक स्थळाची किरकोळ जाळपोळ करण्यात आली असून दुसऱ्या प्रार्थनास्थळाला शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेमुळं संपूर्ण नूह जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. याशिवाय आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
धार्मिक स्थळांना आग लागल्याची घटना समोर आल्याने स्तिती आणखी नये, यासाठी पोलिसांनी नूह जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. याशिवाय सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर आरोपींची धरपकड केली जात आहे. रात्री तीन दुकाने आणि एका टेम्पोला आग लावण्यात आल्याने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. नूह जिल्ह्यातील हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ११६ आरोपींना अटक केली आहे.
संबंधित बातम्या