नवी दिल्लीहून दरभंगाकडे जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेला इटावाजवळ बुधवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. शयनयान बोगीला ही आग लागली. ज्या बोगीला आग लागली त्यामध्ये क्षमतेच्या दुप्पट प्रवासी प्रवास करत होते.आग लागताच प्रवाशांनी खिडकीतून बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवला. दरम्यान या अपघातात जिवीतहानीचे वृत्त नाही. रेल्वेतून उड्या मारल्याने सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
आगीमुळे अनेक बोगी जळून खाक झाल्या आहेत. काही प्रवाशांचे बोगीतील सामानही जळून खाक झाले आहे. ही दुर्घटना इटावाजवळील सराय भूपत रेल्वे स्टेशनजवळ झाला.हावडा- दिल्ली रेल्वे मार्गावर ओएचई बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील रेल्वे सेवा सध्या ठप्प आहे. मार्गावरील १६ ट्रेन थांबवण्यात आल्या आहेत. आगीच्या कारणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. आग इतकी भीषण आहे की दूरवरुन आगीचे लोट दिसत आणि धूर दिसत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
सध्या छठपूजेचं महापर्व सुरु आहे. झारखंड, बिहार आणि उतरप्रदेशमध्ये हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यावेळी छठपूजेचा सण १७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरदरम्यान साजरा केला जात आहे. देशातील इतर राज्यात राहाणारे बिहार,झारखंड आणि उत्तप्रदेशचे नागरिक या सणासाठी आवर्जुन आपल्या घरी येतात. या सणानिमित्ताने नवी दिल्लीहून अनेक नागरिक नवी दिल्ली-दरभंगा एक्स्प्रेसने उत्तरप्रदेशमध्ये येत होते. एक्स्प्रेसच्या तीन बोगींना आग लागली. आग लागताच प्रवाशांनी बोगीतून खाली उडी मारत आपला जीव वाचवला.