लग्नात मानापमानाचे अनेक प्रसंग उदभवल्याचे आपण पाहत असतो. लग्नात जेवणाच्या मेन्यूवरून होणारी हाणामारी तशी नवीन नाही. परंतु एका लग्नात वर पक्षाच्या लोकांना आवडेल असे मटणाचे जेवण ठेवूनसुद्धा हाणामारी झाल्याची घटना तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात घडली आहे. लग्नात वरातीतील मंडळींना मटणाच्या जेवणात फोडी कमी वाढल्या म्हणून वधु पक्षाच्या लोकांसोबत बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीत झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निजामाबाद जिल्ह्यात मातम मुक्कला तालुक्यात बुधवारी रात्री ही घटना घडली. एका मंगल कार्यालयात लग्नकार्य आटोपल्यानंतर वरपक्षाकडील मंडळींसाठी वधुपक्षाकडून मटणाच्या जेवणाची मेजवाणी ठेवण्यात आली होती. जेवण सुरू असताना वाढपींकडून मटणाच्या फोडी कमी प्रमाणात वाढल्या जात असल्याती तक्रार वरपक्षाच्या मंडळींनी केली. त्यानंतर काही वऱ्हाडींनी वाढपींचा जाहीर अपमान केला. काही ज्येष्ठांनी या प्रकरणात मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रकरण अधिक चिघळले.
दोन्ही पक्षाच्या लोकांनी हातात येतील त्या वस्तु आणि भांडी एकमेकांना फेकून मारण्यास सुरूवात केली. यावेळी काहींनी दगड, भांडीकुंडी आणि मंडपातील खुर्च्या एकमेकांवर फेकल्या. परिणामी पंगतीत बसलेल्यांपैकी अनेक जण जीव वाचवण्यासाठी मंडपाबाहेर पळत सुटल्याचे दिसून येत होते. या हाणामारीमुळे मंगल कार्यालयात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. वऱ्हाडींपैकी एकाने मंडपातूनच पोलिसांना या घटनेची सूचना दिली. पोलीसांनी मंगल कार्यालयात येऊन दोन्ही पक्षात मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झाले. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या एकूण ११ लोकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या ६ जणांना निजामाबाद येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
लग्नकार्यात मांसाहारी जेवण न दिल्यामुळे नाराज वऱ्हाडींकडून गोंधळ घालण्यात आल्याची घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. परंतु या घटनेत तर मांसाहारी जेवण देऊन सुद्धा केवळ मटणाच्या फोडी कमी वाढल्यामुळे आपसात मारामारीची घटना घडल्याने सगळीकडे आश्वर्य व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या