Nitish Kumar Viral Video about BJP : बिहारच्या राजकारणानं अनपेक्षित वळण घेतलं असून कालपर्यंत केंद्रातील मोदी सरकारविरोधात राष्ट्रीय पातळीवर मोर्चेबांधणी करणारे संयुक्त जनता दलाचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत जात आहेत. आजच ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जातं. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच नितीश कुमार यांचा जुना व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये नितीश कुमार हे भाजपशी युती करण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना दिसत आहेत. दीड वर्षांपूर्वी भाजपची साथ सोडून नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती केली होती व सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना पुन्हा भाजपशी युतीचा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न झिडकारून लावला होता.
‘भाजपसोबत पुन्हा युती करण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन. कधीच त्यांच्यासोबत जाणार नाही. काय-काय केलं भाजपनं. तेजस्वी यादवांच्या वडिलांवर खटले दाखल केले. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर पुन्हा ते तोडफोड करायला बघत होते. आता माझ्याबद्दल काहीही पसवरतायत. बोगस आहे सगळं,’ अशा शब्दांत नितीश यांनी भाजपवर तोफ डागली होती.
समाजवादी नेते राजीव राय यांनी २००३ चा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘माननीय नितीश कुमार जी, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी आमची इच्छा आहे. तुम्ही मोठे नेते आहात. भाजपच्या विरोधात तुम्ही एक प्रतिज्ञा केली होती, आपण सगळे मिळून ती पूर्ण करूया. तुम्ही ‘इंडिया’ आघाडीचे शिल्पकार आहात. पुन्हा पलटी मारलीत तर लोक काय म्हणतील?,’ असा सवाल राजीव राय यांनी केला आहे.
बिहारच्या राजकारणात नितीश कुमार हे ‘पलटूराम’ म्हणून ओळखले जातात. लालू यादव यांनी नितीश यांना ही पदवी दिली आहे. नितीश यांच्या कोलांटउड्यांच्या राजकारणाची सुरुवात १९९४ साली झाली होती. त्यावेळी त्यांनी जनता दलासोबतचे संबंध तोडून जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टी स्थापन केली होती. त्यानंतर १९९६ मध्ये भाजपशी हातमिळवणी केली आणि वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री बनले.
२००३ मध्ये नितीश कुमार यांनी समता पार्टीचं जनता दलात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि जनता दल (युनायटेड) हा पक्ष बनला. २०१३ मध्ये नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदास विरोध करत एनडीएची १७ वर्षे जुनी युती तोडली. २०१५ च्या निवडणुकीत नितीश कुमार यांनी आरजेडी आणि काँग्रेसला पाठिंबा दिला होता. २०१७ मध्ये त्यांनी ते नातंही तोडलं आणि पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झाले.
२०२० साली ते भाजपसोबत होते. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी भाजपपासून फारकत घेतली आणि आरजेडीसोबतच्या महाआघाडीचा भाग बनले. त्यानंतरच्या दीड वर्षांतच आता ते पुन्हा भाजपसोबत पाट मांडत आहेत.