Sanjoy Deepak Rao : बीटेक झालेला अंबरनाथचा दीपक मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी कसा झाला?
Sanjoy Deepak Rao : गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दीपकच्या मागावर होते. परंतु तावडीत सापडताच पोलिसांनी माओवादी दीपकच्या मुसक्या आवळल्या आहे.
Maoist Sanjoy Deepak Rao : महाराष्ट्रातील बिटेक करून उच्चशिक्षित झालेल्या माओवादी तरुणाला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला नक्षलवादी हायप्रोफाईल असून त्यावर तब्बल दोन कोटी रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. संजय उर्फ दीपक जोग असं आरोपी नक्षलवाद्याचं नाव असून तेलंगणा इंटेलिजन्स ब्युरोने त्याला अटक केल्याची माहिती डीजीपी अंजनी कुमार यांनी दिली आहे. शुक्रवारी कुकटपल्लीतील मलेशियन टाऊनशिपजवळून मोस्ट-वॉन्टेड माओवादीचा केंद्रीय समिती सदस्य संजय दीपक राव याला पकडण्यात आलं आहे. त्याच्या ताब्यातून एक रिव्हॉल्व्हर, एक लॅपटॉप आणि ४७२५० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
माओवादी संजय दीपक राव हा ठाण्याजवळील अंबरनाथ येथील रहिवासी आहे. वडील डाव्या विचारसरणीचे असल्याने त्याचा प्रभाव संजयवर पडला. वडील कम्युनिस्ट कामगार संघटनेचे नेते असल्याने संजयचं वडिलांसह अन्य नेत्यांशी विचारधारेवर नेहमीच बोलणं व्हायचं. त्यानंतर संजय रावने १९८३ साली जम्मू-काश्मिरमधून बी-टेकचं शिक्षण घेतलं. त्यावेळी त्याने तेथील फुटीरतावादी चळवळीला पाठिंबा दिला होता. बी-टेक पूर्ण केल्यानंतर संजय रावने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, लिबरेशन सेंट्रल रिऑर्गनायझेशन कमिटी ग्रुप आणि सीपीआय एमएल रावूफ ग्रुपमध्ये काम केलं. नक्षलवादी चळवळीत काम करण्याचा दीर्घ अनुभव असल्याने त्याला नक्षल्यांच्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आलं होतं.
संजय दीपक राव याने सहकाऱ्यांसह १९९९ साली नक्षलबारी गट स्थापन केला. त्यानंतर त्याने महाराष्ट्रातील शहरी भागातील तरुणांना नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित करण्याचा प्लॅन आखला. मुंबई, पुणे, ठाणे आणि हैदराबाद या शहरांमध्ये जात त्याने अनेक तरुणांना नक्षलवादी चळवळीत सामील करण्याचे प्रयत्न केले. हैदराबादला येत असतानाच सायबराबाद पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर तेलंगणाच्या इंटेलिजन्स ब्युरोने सापळा रचून संजय दीपक रावला अटक केली आहे.
कोर्टाने आरोपी दीपक रावला कोठडी सुनावली असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. दीपक राव महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू पोलिसांना देखील हवा आहे. त्यामुळं आता त्याचे कुणाशी संबंध होते, त्याने कोणत्या घटनांसाठी प्लॅन आखलेला आहे, कोणत्या तरुणांना त्याने नक्षलवादी चळवळीत आणलं?, याची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे.